Palghar News : पालघरजवळ मासेमारी बोटीला मालवाहू जहाजाची धडक

मुंबई : अरबी समुद्रात पालघरजवळ मासेमारी बोटीला मालवाहू जहाजाने धडक दिल्याची दुर्घटना घडली आहे. या धडकेत बोटीवरील चार खलाशी समुद्रात फेकले गेले, परंतु इतर बोटींच्या वेळेवर मदतीमुळे सर्व १५ खलाशी सुखरूप बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्ट रोजी रात्री ९:२५ वाजण्याच्या सुमारास सातपाटीपासून तीन नॉटिकल मैल अंतरावर ही घटना घडली. मुरबे येथील संतोष तरे यांच्या मालकीची ‘श्री साई’ ही मासेमारी बोट समुद्रात असताना एका लाल रंगाच्या मालवाहू जहाजाने तिला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे बोटीवरील १५ पैकी चार खलाशी समुद्रात पडले, परंतु त्यांनी कसेबसे बोटीपर्यंत पोहोचून स्वतःचा जीव वाचवला.
वेळेवर मदतीमुळे अनर्थ टळला
घटनेची माहिती मिळताच ‘जय साईप्रिया’ आणि ‘जय साईराम’ या दोन मासेमारी बोटींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त बोटीला दोरीने बांधून मुरबे बंदराकडे आणण्यास सुरुवात केली. धडकेमुळे बोटीचे मोठे नुकसान झाले असून, त्यात पाणी शिरत होते. खलाशींनी पाणी बाहेर कणकत बोट बंदरापर्यंत आणली. अखेर १५ ऑगस्ट रोजी दुपारी सर्व खलाशी सुखरूप मुरबे बंदरात पोहोचले.
जहाज सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या दुर्घटनेत बोटीचे मोठे नुकसान झाले असले तरी वेळेवर मदतीमुळे मोठा अनर्थ टळला. बोटीतील सर्व १५ खलाशी सुखरूप असून, या घटनेने पुन्हा एकदा समुद्री सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.





