Palghar News : पालघरच्या निवासी शाळेत विद्यार्थ्याचा तापाने मृत्यू; ३० जण रुग्णालयात दाखल
Palghar News : पालघर जिल्ह्यातील मसवान येथील शासकीय आश्रमशाळेत (निवासी शाळा) तीव्र ताप व श्वास घेण्यास त्रास झाल्याने इयत्ता पहिलीतील एका ७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Palghar News : पालघर जिल्ह्यातील एका निवासी शाळेत सात वर्षीय विद्यार्थ्याचा तीव्र ताप आणि श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. तसेच, सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे आढळल्याने इतर ३० विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी प्रशासनाने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केली आहे. (Palghar News)
विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर, कर्तव्यात घोर निष्काळजीपणा केल्याबद्दल शाळेच्या अधीक्षकाला निलंबित करण्यात आले. तसेच, अन्न व औषध प्रशासनाने शाळेच्या स्वयंपाकघराची पाहणी केली आणि तपासणीसाठी अन्नधान्याचे नमुने गोळा केले. (Palghar News)
माहितीनुसार, मसवान येथील आश्रमशाळेतील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्याला २२ ऑगस्ट रोजी तीव्र ताप आला. त्याला उपचारासाठी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. (Palghar News)
सोमवारी त्याला पुन्हा ताप आल्यावर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि त्याला मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. (Palghar News)
मुलाला रुग्णालयात नेल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ईसीजी तपासणी केली आणि त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असेही त्यांनी नमूद केले.
या घटनेनंतर आरोग्य आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली. या शाळेत एकूण ४४९ विद्यार्थी असून त्यापैकी ३९५ विद्यार्थी निवासी आहेत. तसेच, एका वैद्यकीय पथकाने शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी केली.
खबरदारीचा उपाय म्हणून, सर्दी, खोकला किंवा तापाची सौम्य लक्षणे असलेल्या ३० विद्यार्थ्यांना मसवान प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. (Palghar News)
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी विशाल खत्री यांनी शाळा आणि आरोग्य केंद्राला भेट देऊन रुग्णालयात दाखल केलेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांची भेट घेतली. आश्रमशाळेत आरोग्य तपासणीची एक नवीन मोहीम राबवण्यात आली. (Palghar News)
संस्थेच्या आवारात स्वच्छता आणि पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत आणि अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेतली जाईल, असे खत्री यांनी सांगितले. (Palghar News)
विद्यार्थ्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यासाठी, जबाबदारी निश्चित करण्यासाठी एका विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित व्यक्तींवर योग्य प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे पालघर जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. (Palghar News)





