धक्कादायक ! मुलीची हत्या करून पत्नीची आत्महत्या

पालघर : पालघर येथील डहाणूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये घरगुती वादातून एका महिलेने पोटच्या चार वर्षाच्या मुलीची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःदेखील आत्महत्या केली. ही घटना डहाणू परिसरातील सिसणे गावामध्ये घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मृत महिला आपल्या कुटुंबासह कासा पोलिस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्यास होती. तर, तिचा पती मच्छीमार तो सतत कुटुंबापासून दूर असायचा. गेल्या अनेक दिवसानंतर रविवारी तो घरी परतला आणि मित्रांसोबत बाहेर फिरायला गेला. यामुळे दोघांमध्ये भांडण झाले. आपल्याला सोबत नेले नाही म्हणून महिलेला राग अनावर झाला. तिने कशाचाही विचार न करता पोटच्या चार वर्षाच्या मुलीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर घराच्या छताला गळफास लावून स्वत:ही आत्महत्या केली.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करत माय-लेकीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.





