‘शिवतीर्थ’वर हलणार लवकरच पाळणा; राज ठाकरे होणार आजोबा

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या घरात अर्थात शिवतीर्थावरून लवकरच गोड बातमी येणार आहे. म्हणजेच राज ठाकरे यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांचे आजोबा म्हणून प्रमोशन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली अमित ठाकरे हे आई-बाबा होणार आहेत. अमित ठाकरेंना नुकतीच मनसेच्या विद्यार्थी सेनेची जबाबदारी देण्यात आली आहे. अशातच आता त्यांच्या खासगी आयुष्यामधील प्रमोशनची बातमी समोर आली.
राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या नवीन निवासस्थानी सध्या या नव्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी सुरु झाली आहे. राज आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आजी-आजोबा होणार आहेत. दोघेही या बातमीमुळे फार आनंदात असून एप्रिल महिन्यात ठाकरे कुटुंबातील पुढच्या पिढीतील पाहुण्याचे आमगन होणार असल्याची माहिती समोर आली आहे .
काही महिन्यांपूर्वीच राज हे त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानावरुन सहकुटुंब ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी राहण्यासाठी आले आहेत. अमित ठाकरे यांचा विवाह २७ जानेवारी २०१९ रोजी मिताली बोरुडे यांच्याशी झाला. अमित यांच्या लग्नाला जकीय नेत्यांसह, उद्योग, चित्रपट तसेच इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. लोअर परळ येथील येथील सेंट रेजिस या आलिशान हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला होता.
२०१८ मध्ये डिसेंबर महिन्यात अमित आणि मिताली यांचा साखरपुडा पार पडला होता. मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. मिताली यांनी फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. मिताली यांचे वडील संजय बोरुडे हे प्रसिद्ध सर्जन आहेत. राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली यांची चांगली मैत्री आहे. काही वर्षांपूर्वी या दोघींनी मिळून ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.





