गिलगीट-बाल्टीस्तानला स्वतंत्र प्रांत बनवण्याचा पाकिस्तानचा डाव

इस्लामाबाद – भारताचा भूभाग पाकिस्तानच्या हद्दीत दर्शवणारा बनावट नकाशा जगासमोर सादर केल्यानंतर पाकिस्तानने आता गीलगीट-बाल्टीस्तान या भूभागाला पाकिस्तानमधील स्वतंत्र प्रांताचा दर्जा देण्याचा डाव आखला आहे. पाकिस्तानमधील एका मंत्र्याने प्रसार माध्यमांशी बोलताना याबाबतचे सूतोवाच केले आहे.
पाकिस्तानमधील मंत्री अली अमिन गंदापूर यांनी ‘एक्सप्रेस ट्रिब्युन’शी बोलताना गीलगीट-बाल्टीस्तानला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे पाकिस्तान सरकारने ठरवले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान लवकरच या भागाला भेट देतील आणि या संदर्भातील औपचारिक घोषणा करतील, असेही त्यांनी सांगितले.
भारतीय भूभाग पाकिस्तानच्या हद्दीत दर्शवणारा राजकीय नकाशा प्रसिद्ध केल्याबद्दल भारताने पाकिस्तानवर जोरदार टीका केली होती. बनावट नकाशा दर्शवण्याची कृती म्हणजे राजकीय मूर्खपणा असल्याचे भारताने म्हटले होते.
भारतीय राज्य गुजरात तसेच जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमधील काही भागावर हक्क सांगण्याचा हा प्रयत्न अगदी असमर्थनीय आणि राजकीय मूर्खपणाचा आहे, अशा शब्दात भारत सरकारने पाकिस्तानवर जोरदार टीका केली होती.





