पाकच्या काश्मीर एकता दिनाचा जगभरातून निषेध..

नवी दिल्ली – काश्मीरबाबत पाकिस्तानच्या खोट्या कथेचा निषेध करण्यासाठी जगभरातील काश्मिरी जनतेच्या प्रतिनिधींनी पाकिस्तानी दूतावास, उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावासासमोर काल निदर्शने केली. दिनांक ५ फेब्रुवारी हा काश्मीर एकता दिन म्हणून साजरा करण्यामागील पाकिस्तानचा दांभिकपणाचाही यावेळी पर्दाफाश करण्यात आला.
काश्मीरवरचा आपला दावा अधोरेखित करण्यासाठी पाकिस्तानमध्ये काल (सोमवारी) देशभर सुटी जाहीर करण्यात आली होती. मात्र काश्मीरी जनतेने, त्यातही प्रामुख्याने पाक व्याप्त काश्मीर आणि गिलगीट बाल्टीस्तानमधील जनतेने पाकिस्तानबद्दलचा आपला रागच यानिमित्ताने व्यक्त केला.
पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी लंडन, ब्रॅडफोर्ड, ब्रुसेल्स, पीओके आणि गिलगिट बाल्टिस्तानमधील विविध शहरांमध्ये निदर्शने करण्यात आली. ब्रॅडफोर्डमध्ये पाक दूतावासाबाहेर झालेल्या निदर्शनांमध्ये पीओकेमधील जनतेला न्याय्य हक्क मिळण्याची मागणी केली गेली. वीज, शिक्षण यासारख्या मूलभूत गरजा पुरवण्याची मागणी केली गेली. पीओकेमधील न्याय्य हक्कांच्या लढ्याला जम्मू काश्मीर नॅशनल इंडिपेन्डन्स अलायन्सनेही पाठिंबा दर्शवला.
युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीने पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद आणि कट्टरवादाचा मुद्दा उपस्थित केला. पीओकेमधील १६ दहशतवादी संघटना काश्मीरींना धमकावत असतात. आंदोलन न करण्याची धमकी देत असतात, असे यावेळी सांगण्यात आले. पीओकेमधील भरमसाठ दरवाढ आणि अनुदान रद्द केल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ झाल्याचाही निषेध केला गेला होता. यापूर्वी, पाकिस्तानच्या तथाकथित काश्मीर एकता दिनाविरोधात पीओके आणि गिलगिट बाल्टिस्तानच्या काही भागांमध्ये निदर्शने करण्यात आली होती.




