पाकिस्तानची आर्थिक कोंडी ! भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद केल्याने करोडोंचे नुकसान

Pakistan Decision | जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतकडून पाकिस्तानाविरोधात कठोर निर्णय घेण्यात आले. सिंधू जल करार रद्द करण्यासह अटारी बॉर्डर तत्काळ प्रभावाने बंद करण्यात आली, पाकिस्तानी नागरिकांना मिळणारा सार्क व्हिसा रद्द करण्यात आला आहे. असे एकुण पाच निर्णय घेत भारताने पाकिस्तानची कोंडी केली आहे.
दुसरीकडे पाकिस्तानकडून देखील भारताविरोधात काही निर्णय घेण्यात आले. त्यातील एक निर्णय म्हणजे भारतीय विमानांसाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. मात्र पाकिस्तानच्या या निर्णयाने त्यांनाच मोठा फटका बसला आहे.
ओव्हरफ्लाइट शुल्क आता पाकिस्तानला मिळणार नाही
पाकिस्तानला नुकसान होण्याचे मुख्य कारण म्हणजे दिल्ली, अमृतसर, लखनऊ आणि जयपूर सारख्या उत्तर भारतातील शहरांमधून युरोप, मध्य पूर्व, अमेरिका, कॅनडा यासारख्या देशांसाठी उड्डाणे पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून जातात. भारतीय विमाने आता पाकिस्तानवरून जात नसल्याने त्या हवाई क्षेत्रातून जाणाऱ्या भारतीय विमानांकडून आकारण्यात येणारे ओव्हरफ्लाइट शुल्क आता पाकिस्तानला मिळणार नाही.
शिवाय, दक्षिणपूर्व आशियासाठी उड्डाण करणाऱ्या पाकिस्तानी विमान कंपन्यांना भारताला टाळून लांबचा मार्ग स्वीकारावा लागेल. असे केल्याने शेजारील देशाचा खर्चही वाढेल. या निर्णयामुळे पाकिस्तानला लाखो डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागणार आहे.
यापूर्वी 2019 मध्ये भारताने कश्मीरमधील कलम 370 रद्द केले होते. त्यावेळीही पाकिस्तानने हवाई मार्ग बंद केला होता. भारतीय विमान कंपन्यांचे 700 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. भारताने पाकिस्तानला हवाई मार्ग बंद केल्यानंतर पाकिस्तानच्या विमान कंपन्यांचे 400 कोटी रुपयांचे नुकसान झाले. अहवालानुसार, पाकिस्तानचे दररोज 5.4 कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केल्याने त्यांचे १०० दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले होते. त्या काळात दररोज होणारी सुमारे ४०० उड्डाणे आणि पाकिस्तानच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरण (सीएए) व पाकिस्तान आंतरराष्ट्रीय विमान कंपनी (पीआयए)वर त्या निर्णयाचा विपरीत परिणाम झाला होता. आता पहलगाम हल्ल्यानंतर हवाई क्षेत्र बंद केले गेल्याने पाकिस्तानवर पुन्हा अशीच परिस्थिती ओढवण्याची शक्यता स्पष्ट दिसून येत आहे.
पाकिस्तानच्या निर्णयाचा भारतावरही परिणाम
दिल्ली, अमृतसर, जयपूर, लखनऊ व वाराणसी यांसारख्या शहरांमधून येणाऱ्या विमानांना लांबच्या मार्गांनी प्रवास करावा लागत आहे. ही विमाने पाकिस्तानवरून उड्डाण करण्याऐवजी, आता अरबी समुद्रावरून म्हणजे लांबच्या मार्गाने प्रवास करत आहेत. भारतीय विमान कंपन्या देखील पर्यायी मार्ग निवडावा लागत असल्याने इंधन खर्च वाढण्याची आणि उड्डाणांच्या वेळेत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, पाकिस्तानला थेट त्यांच्या विमान उत्पन्नाला फटका बसत आहे.
हेही वाचा :
‘…तोपर्यंत मी परफॉर्मन्स करणार नाही’, नेहा कक्करच्या कॉन्सर्टबाबत आणखी एक सत्य समोर





