उत्तर प्रदेशात पाकिस्तानी महिलेला अटक

नोएडा, (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये एका पाकिस्तानी महिलेला व्हिसा नियमांचा भंग केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. गौतम बुद्धनगरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली.
नौशीन नाझ असे या महिलेचे नाव असून ती मूळची पाकिस्तानातील कराची येथील रहिवासी आहे. दिल्लीमध्ये अजमेरी गेट येथील निवासस्थानी ती आपल्या पती समवेत दीर्घकाळच्या व्हिसाच्या आधारे रहात होती.
व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन करून ती नोएडामध्ये आली होती. दिल्लीतील एका उड्डाणपुलावरून जात असलेली एक बस तपासणीसाठी थांबवण्यात आली. त्या बसमध्ये ही महिला होती. तपासणीनंतर या महिलेला अटक करण्यात आली आणि विदेशी नागरिक कायद्यांतर्गत तिच्याविरोधात ‘एफआयआर’ दाखल करण्यात आली असल्याचे पोलीस प्रवक्त्याने सांगितले.
व्हिसाच्या तरतुदीनुसार या महिलेला दिल्लीबाहेर जाण्यास परवानगी नव्हती. दिल्लीबाहेर कोठेही प्रवास करण्यापूर्वी तिने पूर्वपरवानगी घेणे आवश्यक होते.





