पाकिस्तानात इशनिंदेच्या आरोपाखाली चौघांना फाशीची शिक्षा

लाहोर – पाकिस्तानातील न्यायालयाने चौघा जणांना इशनिंदेच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे. प्रेषितांचा अपमान करणारा, इशनिंदा करणारा मजकूर फेसबुकवर पोस्ट केल्याबद्दल ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सरकारी आणि बचाव पक्षाचे युक्तिवाद आणि साक्षीदारांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी वेगवेगळ्या आरोपांवर मृत्युदंड आणि प्रत्येकी ८० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांना ५.२ दशलक्ष रुपये दंडही ठोठावण्यात आला.
वाजिद अली, अहफाक अली साकिब, राणा उस्मान आणि सुलेमान साजिद अशी मृत्यूदंड ठोठावण्यात आलेल्यांची नावे आहेत. शिजाद फारुकी या व्यक्तीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पाकिस्तान फेडरल इन्व्हेस्टिगेशन सायबर क्राईमने इलेक्ट्रॉनिक गुन्हे प्रतिबंधक कायद्याखाली या चघांविरोधात प्रकरण दाखल केले होते.
पाकिस्तानमध्ये इशनिंदेच्या कायद्याचा नेहमी अल्पसंख्यांकांना लक्ष्य करण्यासाठी गैरवापर केला जात असतो, असे ऍम्नेस्टी इंटरनॅशनलने म्हटले आहे.





