उधमपुर एअर बेस ‘नष्ट’चा पाकिस्तानचा दावा फोल; भारताने उघड केला खोटारडेपणा

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या आणखी एका खोट्या दाव्याची पोल भारताने उघड केली आहे. पाकिस्तानच्या ‘एआयके न्यूज’ने उधमपुर एअर बेस नष्ट केल्याचा खोटा दावा करत व्हायरल केलेला व्हिडिओ पूर्णपणे बनावट आणि भ्रामक असल्याचे भारताच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो (पीआयबी)ने स्पष्ट केले आहे. हा व्हिडिओ राजस्थानच्या हनुमानगढ येथील एका केमिकल फॅक्ट्रीत लागलेल्या आगीचा जुना फुटेज असल्याचे फैक्ट-चेकमध्ये उघड झाले आहे.
पाकिस्तानने सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या या व्हिडिओचा भारत-पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीशी किंवा कोणत्याही लष्करी कारवाईशी संबंध नसल्याचे पीआयबीने म्हटले आहे. जनतेला सतर्क राहण्याचे आणि केवळ सरकारी व अधिकृत स्त्रोतांवरून माहिती घेण्याचे आवाहन पीआयबीने केले आहे. उधमपुर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनीही लोकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
शनिवारी झालेल्या परराष्ट्र व संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव मिस्री यांनी पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांचा पर्दाफाश केला. ते म्हणाले, “पाकिस्तान भारतात खोट्या बातम्यांद्वारे सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये सामान्य नागरिकांवर हल्ले होत आहेत, मात्र भारतीय लष्करी तळ सुरक्षित आहेत.” मिस्री यांनी पाकिस्तानच्या नागरी वास्तूंवरील हल्ल्यांचाही निषेध केला. जनतेने सोशल मीडियावरील अपुष्ट माहिती शेअर न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.





