48 तासांत देश सोडा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना आदेश

नवी दिल्ली : जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याविरोधात संपूर्ण देशात राग आणि द्वेषाचे वातावरण आहे. या हल्ल्यानंतर परदेश दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने भारतात परत येत कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक घेतली. या बैठकीत भारताने सीमेपलीकडील दहशतवादाचा तीव्र निषेध करत अनेक कठोर निर्णय घेतले.
पहलगाम दहशतावादी हल्ल्यावरून काय कारवाई करायची यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषद घेत सरकारने घेतलेले निर्णय जाहीर केले.
पाकिस्तानचा भारतातील दूतावास बंद करण्यात आला असून तेथील सर्व राजदूत तसेच भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी केवळ 48 तासांचा वेळ देण्यात आला आहे. याशिवाय, पाकिस्तानसाठी महत्त्वाचा असलेला सिंधू जल करार स्थगित करण्यात येणार आहे. यामुळे पाकिस्तानात पाणी संकट निर्माण होऊ शकते. 1960 पासून या दोन्ही देशांमध्ये हा करार लागू आहे.
याशिवाय वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. पाकिस्तानी नागरिकांना मंजूर केलेला भारतातील व्हिसा रद्द करण्यात येत आहे. तसेच, भारतातील पाकिस्तान दुतावासाच्या अनुषंगाने देखील महत्त्वाचा निर्णय या बैठकीत झाला आहे. दरम्यान, पाकिस्तानची व्यापाराच्या दृष्टीने कोंडी करण्याची रणनीती भारताने आखली असून आजच्या बैठकीतील निर्णयाचा दूरगामी परिणाम भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर होणार आहे.
आज सर्वपक्षीय बैठक?
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावणार आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. या बैठकीचे अध्यक्षपद संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे भूषवण्याची शक्यता आहे. या बैठकीसंदर्भात राजनाथ सिंह आणि अमित शहा हे सर्व पक्षांच्या प्रमुखांशी बोलणार आहेत. दरम्यान, काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर सर्व पक्षांची बैठक बोलावण्याची मागणी केली होती.





