‘शाहरुखनं माझी नक्कल केली…’ ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्याने केला धक्कादायक दावा

मुंबई : सुपरस्टार बॉलीवूडचा किंग शाहरुख खानचा ‘कभी अलविदा ना कहना’ हा चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजला होता. या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात किंग खानने देव सरन नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. शाहरुखच्या या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. शाहरुख खानसोबत या चित्रपटात राणी मुखर्जी, प्रीती झिंटा आणि अभिषेक बच्चन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली होती. आता शाहरुख खानच्या या गाजलेल्या सिनेमात त्यानं आपली नक्कल केली होती असा आरोप एका पाकिस्तानी अभिनेत्याकडून करण्यात आला आहे.
काय केला आरोप?
पाकिस्तानी अभिनेता तौकीर नासिरने ‘कभी अलविदा ना कहना’बाबत धक्कादायक दावा केला आहे. ‘जबरदस्त विथ वासी शाह’ या पाकिस्तानी यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तौकीर नासिर म्हणाला, ‘शाहरुख खानने एक चित्रपट केला आहे ज्यात त्याने परवाजमधील माझ्या व्यक्तिरेखेची हुबेहुब कॉपी केली आहे. ज्याचं मी कौतुक करतो, पण त्यालाही श्रेय दिलं पाहिजे. बरं, ते करण जोहरला द्यायला हवं होतं.’ तौकीर नासिर पुढे म्हणाला, ‘कभी अलविदा ना कहना’मध्ये शाहरुख खान लंगडत चालतो, तोही उजव्या पायाने, हे माझ्याच भूमिकेतून घेतलं आहे. हे पात्र खूपच गुंतागुंतीचे होतं, ज्याच्यासमोर दोन पर्याय होते. एक जी त्याला आवडते आणि दुसरी जिला तो आवडतो. पण ‘कभी अलविदा ना कहना’ मध्ये ही संकल्पना थोड्या फिल्मी पद्धतीने दाखवण्यात आली आहे. पण त्याचं श्रेय मला द्यायला हवं होतं.’ असं तो म्हणाला आहे.
शाहरुख खानच्या ‘कभी अलविदा ना कहना’ या चित्रपटात राणी मुखर्जी, प्रीती झिंटा, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन आणि किरण खेर या स्टार्सनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाचं दिग्दर्शन करण जोहरनं केलं होतं. या चित्रपटाची कथा विवाहबाह्य संबंधांवर आधारित होती. थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर ‘कभी अलविदा ना कहना’ चर्चेत आला. हा चित्रपट विवाहबाह्य संबंधांना प्रोत्साहन देतो, त्यामुळं या चित्रपटाला अनेक प्रेक्षकांचा विरोध सहन करावा लागला होता.





