ना’पाक’ डाव पुन्हा उधळला; बीएसएफला सापडलं भूमिगत भुयार

नवी दिल्ली : पाकिस्तानचा नापाक डाव उधळून लावण्यात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना पुन्हा एकदा यश आलं आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारत-पाकिस्तान सीमारेषेजवळ तैनात BSF च्या जवानांना सीमेलगत भूमिगत भुयार सापडलं असून यामध्ये कराचीमध्ये तयार झाल्याची खूण असणारे पाईप आणि बंकरमध्ये असतात तशी वाळूची पोती सापडली आहेत. भूमिगत भुयार सापडल्यानंतर सीमेवर तैनात जवानांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
जम्मूच्या सांबा भागात पहारा देणाऱ्या बीएसएफच्या टीमला 50 मीटर लांब खोदलेलं हे भूमिगत भुयार गुरुवारी आढळून आलं. या भुयाराच्या तोंडाशी 8-10 प्लॅस्टिकच्या गोण्या दिसल्या. त्यात वाळू भरलेली होती. कराची आणि शकरगढ असं या गोण्यांवर लिहिलेलं होतं.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूच्या सांबा भागातील भारत-पाक सीमेच्या कुंपणाखाली हे मोठं भुयार खोदलेलं आढळलं आहे. यानंतर परिसरामध्ये अशी आणखी भूमिगत भुयारं आहेत का याचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येत आहे.
या भुयाराचा वापर करून भारतात दहशतवादी किंवा शत्रूसैन्य घुसवण्याचा डाव पाकिस्तान रचत असल्याचा संशय आहे.
सीमा सुरक्षा दलाचे सरसंचालक राकेश अस्थाना यांनी, एकही घुसखोर भारतीय भूमीत प्रवेश करता कामा नये, यासाठी जवानांना खडा पहारा देण्याचे आदेश दिले आहेत.
भारतीय सीमेमध्ये सापडलेल्या या भुयारापासून सुमारे 400 मीटरवर पाकिस्तानी पोस्ट असून त्यांनी तिथपासूनच हे भुयार खणलं असण्याची शक्यता आहे. याखेरीज गोण्यांवर असलेली तयार केल्याची व एक्स्पायरी तारीख यावरून ही सामग्री नुकतीच तयार झाल्याचं उघड आहे.





