पाकिस्तानला भारताबरोबर शांततेचे संबंध हवेत, पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी व्यक्त केली चर्चेची इच्छा

इस्लामाबाद – पाकिस्तानला भारताबरोबर शांततेचे संबंध हवे आहेत. समानता, न्याय आणि परस्पर सन्मानाच्या मुद्द्यांच्या आधारे भारताबरोबर शांततेचे संबंध आपल्याला अपेक्षित असल्याचे शरीफ यांनी म्हटले आहे. मात्र, त्याचबरोबर काश्मीरच्या मुद्द्यावर देखील तोडगा निघणे आपल्याला अपेक्षित असल्याचे शरीफ यांनी म्हटले आहे.
काश्मीर प्रश्नी भारत – पाकिस्तान दरम्यान सर्वसामान्य द्विपक्षीय संबंध आणि पाकिस्तानातून सीमापार दहशतवाद हद्दपार करण्यासह दक्षिण आशियामध्ये स्थायी शांतता आणि स्थिरता राहावी, यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने अनुकूल भूमिका घ्यावी, असे आवाहनदेखील शरीफ यांनी केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या नवीन राजदूतांची पाकिस्तानमध्ये नियुक्ती झाल्यानंतरच्या बैठकीच्यावेळी शरीफ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, असे पाकिस्तानातील एका वर्तमानपत्राने म्हटले आहे.
दहशतवाद, शत्रुत्व आणि हिंसाचारमुक्त वातावरणात पाकिस्तानबरोबर सामान्य संबंधांची भारतालाही अपेक्षा आहे, असे भारताने पाकिस्तानला यापूर्वी अनेकदा सांगितले आहे. दहशतवाद मुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पाकिस्तानचीच आहे, असेही भारताने पाकिस्तानला सांगितले आहे.





