संयुक्तराष्ट्रे – अमेरिकेतील आधीच्याच प्रशासनाने अफगाणिस्तानातून सैन्य माघारीचा निर्णय घेतला होता. विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केवळ तो निर्णय पुर्ण करण्याचे काम केले आहे.त्यांचा हा निर्णय लॉजिकली योग्यच होता अशा शब्दात पाकिस्तानचे संयुक्तराष्ट्रांतील राजदूत अक्रम यांनी बायडेन यांचे संयुक्तराष्ट्रांत समर्थन केले आहे.
सोमवारी संयुक्त राष्ट्रांमध्ये बोलताना ते म्हणाले की, आता आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तानात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी एकत्रितपणे काम केले पाहिजे.
ते म्हणाले की जेव्हा अमेरिका आणि नाटोच्या फोैजा मोठ्या संख्येने अफगाणिस्तानात होत्या त्यावेळीच अफगाणिस्तानच्या प्रश्नावर तोडगा काढला गेला पाहिजे होता. अमेरिकेने तेथील सैन्य मागे घेणे हा तेथील परिस्थितीवरचा अंतिम तोडगा होता. ही प्रक्रिया अमेरिकेच्या आधीच्याच प्रशासनाने सुरू केली होती. ती बायडेन यांनी पुर्ण केली.
यात बायडेन यांची काही चूक आहे असे म्हणता येणार नाही अशा शब्दात त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांचे समर्थन केले. अफगाणिस्तानातील स्थिती बाबत सध्या अमेरिकेतूनच बायडेन यांना जबाबदार धरले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर अक्रम यांनी बायडेन यांची जी पाठराखण केली त्याला महत्व दिले जात आहे.
त्यांनी म्हटले आहे की अफगाणिस्तानातील अनेक राजकीय पक्षांचे नेते व बहुवांशिक गटांचे नेते सध्या इस्लामाबादेत आहेत. त्यांच्याशी चर्चा करून आम्ही अफगाणिस्तानातील पेचप्रसंगावर तोडगा काढू.