पाकिस्तानमध्येही ‘एमपॉक्स’चा शिरकाव, सौदी अरेबियातून परतलेल्या व्यक्तीमध्ये आढळला विषाणू

Pakistan Mpox Case: पाकिस्तानमध्ये एमपॉक्सचे या वर्षातील पहिले प्रकरण समोर आले आहे. अलीकडेच सौदी अरेबियातून परतलेल्या व्यक्तीमध्ये या विषाणूची पुष्टी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एआरवाय न्यूजने ही माहिती दिली आहे. मर्दानमधील एक व्यक्ती 3 ऑगस्ट रोजी पाकिस्तानात पोहोचला होता. पेशावरला पोहोचल्यानंतर काही वेळातच त्याला लक्षणे दिसू लागली आणि तो तपासणीसाठी रुग्णालयात गेला. एआरवाय न्यूजनुसार, पेशावरमधील खैबर मेडिकल युनिव्हर्सिटीने या आजाराची पुष्टी केली आहे.
खबरदारीच्या उपाययोजना –
सौदी अरेबियातून परतलेल्या एका व्यक्तीमध्ये एमपॉक्स विषाणू आढळल्यानंतर खळबळ उडाली. आरोग्य अधिकाऱ्यांनी सौदी अरेबियाहून त्याच्या फ्लाइटमधील सहप्रवाशांसह संक्रमित माणसाच्या जवळच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्याचे आणि त्यांचे निरीक्षण करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
स्वीडनमध्येही आढळले एमपॉक्स प्रकरण –
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने एमपॉक्स च्या वाढत्या धोक्याबद्दल इशारा दिला होता. यापूर्वी, आफ्रिकेबाहेर एमपॉक्सचे पहिले प्रकरण स्वीडनमध्येही आढळून आले आहे. फक्त एक दिवस आधी, जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराला दोन वर्षांत दुसऱ्यांदा जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केले होते. स्वीडिश पब्लिक हेल्थ एजन्सीचे महासंचालक ऑलिव्हिया विग्झेल यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, आफ्रिकेतील एका भागात जिथे हा आजार पसरला आहे तिथे राहत असताना संक्रमित व्यक्तीला विषाणूचा संसर्ग झाला.
एमपॉक्समुळे किती लोकांचा मृत्यू –
काँगोसह 13 आफ्रिकन देशांमध्ये एमपॉक्स वेगाने पसरत आहे. या आजारामुळे आतापर्यंत 524 लोकांचा मृत्यू झाला आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस यांनी एमपॉक्स वाढीवर आयएचआर आपत्कालीन समितीच्या बैठकीनंतर मीडिया ब्रीफिंग आयोजित केली होती. ते म्हणाले की तीन वर्षात एमपॉक्स आणीबाणीच्या स्थितीत पोहोचण्याची ही दुसरी वेळ आहे, जागतिक आरोग्य संघटनेना आफ्रिकेत एमपॉक्स उद्रेकांवर काम करत आहे.





