पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी PML-N पक्षाच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा, बंधू नवाझसाठी तयार केला मार्ग

इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज या सत्तारुढ पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. थोरले बंधू आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पक्षाचे अध्यक्ष बनता यावे यासाठी शाहबाज शरीफ यांनी त्यांच्यासाठी ही जागा रिकामी करून दिली आहे, असे मानले जाते आहे. पीएमएल-एन पक्षाच्या सरचिटणीसांना शाहबाज शरीफ यांनी पत्र पाठवून आपला राजीनामा दिला आहे. (Pakistan PM Shehbaz Sharif Resigns As PML-N President, Makes Way For Brother Nawaz’s ‘Rightful Place’)
पाकिस्तानमध्ये २०१७ साली घडलेल्या गोंधळाच्या घटनांमुळे नवाज शरीफ यांना अन्यायकारकपणे पंतप्रधानपद आणि पक्षाचे अध्यक्षपद देखील सोडावे लागले होते. मात्र नवाज शरीफ पाकिस्तानमध्ये परत येईपर्यंत ही आपल्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी होती, याची आपल्याला जाणीव आहे, याचा संदर्भ शाहबाज शरीफ यांनी आपल्या राजीनाम्यामध्ये दिला आहे. पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारून नवाज शरीफ यांनी आपल्यावर विश्वास दाखवल्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे. आमच्या नेत्याला आपण ही जबाबदारी परत देत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
इस्लामाबाद उच्च न्यायालयाने २९ नोव्हेंबरला नवाज शरीफ यांना अव्हेनफिल्ड प्रकरणातून निर्दोष मुक्त केले आहे. पुढच्या महिन्यात, १२ डिसेंबर रोजी नवाज शरीफ यांना उच्च न्यायालयाने अल-अझिझिया संदर्भात देखील निर्दोष मुक्त केले आहे. या सर्व घडामोडींचा विचार करता आता नवाज शरीफ यांच्याकडे पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा सोपवली जावी आणि त्यांनी ती जबाबदारी पुन्हा मानाने स्वीकारावी, असा आपला विचार असल्याचे शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे.
२०१७ मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने नवाज यांना परदेशात दडवलेल्या त्यांच्या बेकायदेशीर संपत्तीबद्दल पनामा पेपर्सच्या खुलाशांशी संबंधित प्रकरणांमध्ये कथित भ्रष्टाचारासाठी पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष म्हणून अपात्र ठरविले होते.





