पाकिस्तानचा मूर्खपणा सुरुच! संसदेत पारित केला काश्मीरसंदर्भातील ठराव, केली ‘ही’ मागणी

Pakistan Parliament Resolution | पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचा राग आवळला आहे. पाकने त्यांच्या संसदेत काश्मीरसंदर्भातील एक ठराव पारित केला. यात भारताने काश्मीरमध्ये जनमत चाचणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. भारताकडून अनेकदा जनमत चाचणीची मागणी फेटाळ्यात आली आहे. असे असले तरीही पाककडून वारंवार अशाप्रकारचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.
रिपोर्टनुसार, काश्मीर प्रकरणांचे मंत्री अमीर मुहम्मद यांनी हा प्रस्ताव मांडला. यामध्ये काश्मिरी नागरिकांच्या स्वनिर्णयाच्या हक्कासाठी पाकिस्तानकडून अतूट नैतिक, राजकीय आणि राजनैतिक समर्थन देण्याची भूमिका या प्रस्तावात मांडण्यात आली आहे. पाकच्या मंत्र्यांकडून अचानक हा प्रस्ताव का मांडण्यात आला, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
या प्रस्तावामध्ये शूर काश्मिरींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. तसेच, मानवाधिकार परिस्थिती सुधारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या काश्मिरी नेत्यांना सोडावे व सर्व दडपशाही कायदे रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
भारत सरकारने जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम 370 रद्द केले होते. हे कलम रद्द केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. तसेच, भारताने जम्मू-काश्मीर हे नेहमीच देशाचा अविभाज्य भाग होते व राहील, अशी भूमिका वारंवार घेतली आहे. असे असले तरीही पाककडून वारंवार काश्मीरसंदर्भातील प्रस्ताव मांडले जातात.
मंत्री अमीर मुहम्मद यांनी जम्मू-काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्राने मध्यस्थी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच, पाकिस्तान नेहमीच काश्मिरी नागरिकांसोबत ठामपणे उभा असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.





