पाकिस्तानला आता “ब्रिक्स’ राष्ट्रांचे सदस्यत्व मिळविण्याची ओढ

इस्लामाबाद – प्रचंड आर्थिक संकट आणि राजकीय अस्थिरतेने ग्रासलेल्या पाकिस्तानला आता “ब्रिक्स’ राष्ट्रांचे सदस्यत्व मिळविण्याची ओढ लागली आहे. याबाबत पाकिस्तान अगदीच हतबल दिसत असून त्यांनी गुरुवारी ब्रिक्स समूहाच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे. सध्या ब्राझील, चीन, रशिया, भारत आणि दक्षिण आफ्रिका ब्रिक्सचे सदस्य आहेत.
या वर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या “ब्रिक्स’ परिषदेत अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा नवीन सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. हे सर्व देश 2024 मध्ये रशियात होणाऱ्या शिखर बैठकीत सहभागी होणार आहेत.
जागतिक शांततेसाठी वचनबद्ध?
पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच म्हणाल्या, आम्ही ब्रिक्समध्ये सामील होण्यासाठी अर्ज केला आहे कारण हा विकसनशील देशांचा मोठा समूह आहे. पाकिस्तानला ब्रिक्स सदस्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. आम्ही पाकिस्तानी जागतिक शांतता आणि विकासासाठी वचनबद्ध आहोत. जर पाकिस्तान ब्रिक्समध्ये सामील झाला तर ते पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सर्वसमावेशक विकासाला पुनरुज्जीवित करण्यास मदत करेल, असेही मुमताज बलोच म्हणाल्या.
मॉस्कोमधील पाकिस्तानचे राजदूत मुहम्मद खालिद जमाली म्हणाले, आम्ही 2024 मध्ये ब्रिक्स देशांमध्ये सामील होण्यासाठी अर्ज केला आहे. आम्हाला विश्वास आहे की मॉस्को आम्हाला सदस्यत्व प्रक्रियेत मदत करेल. रशियाच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्समध्ये सामील होण्याची आमची योजना आहे.





