Pakistan News : इम्रान खान यांच्या अटके दरम्यान बेपत्ता झालेला ‘तो’ यूट्युबर अखेर 4 महिन्यानंतर आला घरी

नवी दिल्ली – पाकिस्तानमध्ये (Pakistan) चार महिन्यांपासून बेपत्ता असलेला एक निवेदक आणि यूट्युबर घरी परतले आहेत. इम्रान रियाझ खान असे या 47 वर्षीय निवेदकाचे नाव असून ते माजी पंतप्रधान इम्रान खान (imran khan) यांच्या अटकेनंतर 9 मे रोजी उसळलेल्या दंगलीपासून बेपत्ता झाले होते. नुकतंच ते आपल्या घरी परतले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
इम्रान रियाझ खान यांना यूट्युबवर तब्बल 3 दशलक्ष फॉलोअर असून देशभर उसळलेल्या दंगलीनंतर दोन दिवसांनी त्यांना अटक करण्यात आली होती. पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचार प्रकरणी अटक झाल्यावर 9 मे रोजी ही दंगल उसळली होती.
निवेदक इम्रान रियाझ खान हे पंतप्रधान इम्रान खान यांचे कट्टर समर्थक असून इम्रान यांच्या विरोधकांचे कडवे टीकाकार आहेत. पंतप्रधान इम्रान खान यांना गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागल्यानंतर पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे लागले होते.
तेंव्हापासून निवेदक इम्रान रियाझ खान यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधकांवर टीका करणारे व्हिडीओ इंटरनेटवर पोस्ट केले होते. अटकेनंतर निवेदक इम्रान खान यांना पंजाब प्रांतातील लाहोरला आणि नंतर सियालकोट तुरुंगात नेण्यात आले होते.
मात्र त्यांना तुरुंगातून सोडून देण्यात आल्याचे पोलिसांनी 15 मे रोजी लाहोर उच्च न्यायालयात सांगितले होते. सुटका करताना सुटका झाल्याचे पत्र लिहून घेण्यात आले होते.
मात्र ते घरी परतले नव्हते. ते घरी सुखरुप पोचल्याचे पोलिसांनी आज माध्यमांना सांगितले. मात्र त्यांच्या ठावठिकाण्याबाबतचा कोणताही तपशील देण्यात आला नाही.





