प्रेयसीसाठी आणलेला बर्गर मित्राने खाल्ला; तो भडकला अन् थेट गोळी घालून केला मित्राचा खात्मा

कराची, – प्रेयसीसाठी आणलेला बर्गर मित्राने खाल्ल्यामुळे भडकलेल्या एका मुलाने आपल्याच मित्राची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना पाकिस्तानात घडली आहे. तेथील एआरवाय न्यूजने ८ फेब्रुवारी रोजी घडलेली ही घटना समोर आणली आहे. (Pakistan Man Kills Friend For Taking A Bite From His Girlfriend’s Burger)
कराचीच्या पॉश डिफेन्स एरियात ही घटना घडली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. विशेष म्हणजे या घटनेतील दोन मित्रांपैकी एक पोलीस अधिकाऱ्याचा तर एक न्यायाधीशाचा मुलगा असल्यामुळे तपास करणाऱ्या पोलिसांनाही घाम फुटला आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार सत्र न्यायाधीशाचा मुलगा अलि किरीयो त्याचा मित्र दानियल याच्या घरी आला होता. दानियल हा वरिष्ठ पोलीस अधिक्षक नजीर अहमद मीरबहार यांचा मुलगा आहे. चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार दानियलने त्या दिवशी त्याच्या प्रेयसीसाठी बर्गर आणला होता.
त्या बर्गरचा काही भाग अलिने बळजबरीने खाल्ला आणि त्यामुळे त्या दोघांचे भांडण सुरू झाले. भांडण विकोपाला गेल्यावर दानियलने तेथेच असलेल्या गार्डच्या रायफलमधून अलिवर गोळी झाडली. जखमी अलिला रूग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तूर्त आरोपी दानियल नजीर याला ताब्यात घेण्यात आले असून लवकरच खटला सुरू होण्याची शक्यता आहे.





