पाकिस्तान… पहा! एस-४०० येथे सुरक्षितपणे उभे; मोदींनी शेअर केलेल्या फोटोने पाकचा खोटा दावा पुन्हा उघड

जालंधर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी पंजाबमधील जालंधर येथील आदमपुर एअरबेसला भेट दिली. त्यांनी भारतीय वायुसेनेच्या जवानांशी संवाद साधला, त्यांचा उत्साह वाढवला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत माहिती घेतली. यावेळी त्यांनी पाकिस्तानचा S-400 एअर डिफेन्स सिस्टम नष्ट केल्याचा खोटा दावा उघडकीस आणला. भारत-पाकिस्तानदरम्यान हल्ल्यांचा जोर सुरू असताना पाकिस्तानने आपल्या जेएफ-१७ लढाऊ विमानांनी आदमपुर येथील S-400 नष्ट केल्याचे म्हटले होते.
पंतप्रधान मोदी यांनी S-400 सिस्टमसमोर फोटो काढून तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर केला. या फोटोत S-400 सुरक्षित दिसत आहे. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये मोदी म्हणाले, “आज सकाळी मी वायुसेना स्टेशन आदमपुरला भेट दिली आणि वीर वायुयोद्ध्यांशी संवाद साधला. त्यांचे साहस, दृढनिश्चय आणि निडरता यांचा अनुभव घेणे खास होते.”
Sharing some more glimpses from my visit to AFS Adampur. pic.twitter.com/G9NmoAZvTR
— Narendra Modi (@narendramodi) May 13, 2025
पाकिस्तानने S-400 नष्ट केल्याचा दावा भारतीय सैन्याने यापूर्वीच फेटाळला होता. आज मोदींनी शेअर केलेल्या फोटोने पाकिस्तानचा खोटा दावा पुन्हा उघड झाला. या भेटीला भारत-पाकिस्तान तणाव आणि ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर सैन्याच्या तयारी व रणनीतिक दृढतेचे प्रदर्शन मानले जाते. जवानांनी “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम”च्या घोषणांनी जोश दाखवला.





