Pakistan : ऐन रमजानच्या महिन्यात पाकिस्तानवर उपासमारीची वेळ; जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भिडल्या गगनाला

Pakistan : अलिकडच्या काळात संपूर्ण जगाने पाहिले आहे की पाकिस्तानी जनता पीठ, डाळी आणि तांदूळ यासारख्या मूलभूत गरजांसाठी आसुसलेली आहे. शिवाय, महागाईच्या या युगात, दुकानदार त्यांच्या मनमानी दराने वस्तू विकून ग्राहकांचे आणखीच हाल करत आहेत.
हे लक्षात घेऊन, अलीकडेच पिठाचे दर निश्चित करण्यात आले आहेत. कराची आयुक्तांनी जारी केलेल्या नवीन अधिसूचनेनुसार, चक्की आटा (बारीक पिठ) आता १०० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध असेल.
कराचीचे आयुक्त सय्यद हसन नक्वी यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, बारीक पिठाची किंमत प्रति किलो ९२ रुपये निश्चित करण्यात आली आहे.
दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रित राहाव्यात आणि सामान्य लोकांवर महागाईचा बोजा वाढू नये म्हणून सरकार हे पाऊल उचलत आहे. दुकानदारांनी मनमानी दर आकारू नयेत आणि लोकांना वाजवी दरात पीठ खरेदी करता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
मटणाची किंमत २७०० आणि चिकनची किंमत ७०० रुपये :
दुसरीकडे, महागाईचा परिणाम फक्त पिठापुरता मर्यादित राहिला नसून दोन दिवसांपूर्वी सियालकोटमध्ये कोंबडीच्या मांसाच्या किमतीत १०७ रुपयांची वाढ करण्यात आली होती.
या मोठ्या वाढीनंतर, नवीन किंमत ७०० रुपये प्रति किलो झाली. तर मटणाची किंमत १८०० रुपयांवरून २७०० रुपये प्रति किलो झाली आहे. त्याचप्रमाणे गोमांसाची किंमत ८०० रुपयांवरून १२०० रुपये प्रति किलो झाली आहे.
सरकारी अधिसूचनेनुसार, या नवीन किमती तात्काळ लागू होतील आणि पुढील आदेश येईपर्यंत लागू राहतील. सर्व दुकानदारांना त्यांच्या दुकानांवर अधिकृत दर यादी स्पष्टपणे लावावी लागेल.
अधिकाऱ्यांनी कडक सूचना दिल्या आहेत की कोणतीही व्यक्ती किंवा संस्था स्वतःची वेगळी किंमत यादी जारी करू शकत नाही. जर एखादा दुकानदार निश्चित किमतीपेक्षा जास्त किंमत आकारत असेल तर ग्राहक त्याबद्दल तक्रार करू शकतात.
जनतेमध्ये उडाला गोंधळ !
रमजान महिन्याच्या आगमनाने, लोकांसमोरील सर्वात मोठी समस्या महागाई बनली आहे. रमजानमुळे फळे, भाज्या आणि मांसाचे भाव अचानक गगनाला भिडले आहेत आणि ते सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता किमती निश्चित करण्यासारखी पावले उचलावी लागत आहेत.





