Champions Trophy : पाकिस्तानच्या नावावर झाला लाजिरवाणा विक्रम; चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच देश

यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तानने केले होते. मात्र ही चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा एखाद्या वाईट स्वप्नासारखी ठरली. पाकिस्तानला गट टप्प्यातील एकही सामना जिंकता आलेला नाही. हे सामने घरच्या मैदानावर खेळवण्यात आले तरीदेखील पाकिस्तानला एकही सामना जिंकता आला नाही. पाकिस्तानने स्पर्धेतील सुरूवातीचे दोन सामने गमावल्यामुळे त्यांना या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. तर तिसरा बांगलादेशविरूद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. यादरम्यान पाकिस्तानच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली.
कोणता लाजिरवाणा विक्रम झाला नावावर ?
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत एकूण आठ सीझन खेळले गेले आहेत. पण यजमान राष्ट्राने स्पर्धेत एकही सामना जिंकलेला नाही, असे यापूर्वी कधीचं घडले नव्हते. २००० मध्ये, जेव्हा केनियाने आयसीसी नॉकआउट स्पर्धेचे आयोजन केले होते, तेव्हा केनियाचा संघ एकच सामना खेळला पण तो सामनाही संघाने गमावत स्पर्धेतून बाहेर पडला. पण त्यावेळी या स्पर्धेतील सर्व सामने बाद फेरीसारखे खेळले जात होते, जो संघ पराभूत होत असे तो स्पर्धेतून बाहेर जात असे.
२००२ मध्ये या स्पर्धेचे नाव आयसीसी नॉकआऊट बदलून चॅम्पियन्स ट्रॉफी करण्यात आले. तेव्हापासून २०१७ पर्यंत, यजमान राष्ट्राने स्पर्धेत एकही सामना जिंकला नाही असे कधीही घडले नाही. पण हा लाजिरवाणा विक्रम चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये पाकिस्तानच्या नावावर झाला.पाकिस्तान ही चॅम्पियन्स ट्रॉफी कधीही विसरणार नाही हे मात्र नक्की.
पाकिस्तानची स्पर्धेतील कामगिरी
पाकिस्तान या स्पर्धेत दोन सामने खेळला. त्यांचा पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध झाला होता. या सामन्यात त्यांना ६० धावांनी पराभव पत्करावा लागला होता. यानंतर त्यांचा दुसरा सामना भारताबरोबर झाला या सामन्यातदेखील त्यांचा पराभव झाला. यानंतर त्यांचा तिसरा सामना बांगलादेश बरोबर होणार होता मात्र हा सामना पावसामुळे रद्द झाल्याने पाकिस्तान आणि बांगलादेशला प्रत्येकी १ गुण देण्यात आला. मात्र पाकिस्तानचा रनरेट बांगलादेशपेक्षा कमी असल्यामुळे त्यांना गुणतालिकेत तळाशी राहावे लागले.





