संकटात सापडलेल्या पाकिस्तानच्या मदतीला धावला सौदी अरेबिया, देणार आठ अब्ज डॉलर्स

लाहौर – पैशांच्या तुटवड्याचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला सौदी अरेबियाने मदतीचा हात पुढे केला आहे. रविवारी समोर आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार, सौदी अरेबियाने पाकिस्तानला सुमारे आठ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे मदत पॅकेज देण्याचे मान्य केले आहे. या पॅकेजमुळे पाकिस्तानचा घसरत चाललेला परकीय चलन साठा आणि संकटात सापडलेली अर्थव्यवस्था सावरण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
चलनवाढीचा उच्च दर, कमी होत असलेला परकीय चलन साठा, चालू खात्यातील गंभीर तूट आणि चलन कमकुवत झाल्यामुळे पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक आव्हानांनी ग्रासलेला आहे. रिपोर्टनुसार, हा करार पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सौदी अरेबिया दौऱ्यादरम्यान झाला होता.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने तेलासाठीचा निधी 1.2 अब्ज डॉलरवरून 2.4 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला होता, जो सौदी अरेबियाने स्वीकारला. तथापि, अद्याप तांत्रिक बाबींवर काम केले जात आहे आणि करार प्रत्यक्षात येण्यासाठी काही आठवडे लागतील. या करारासाठी पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल सध्या सौदी अरेबियात आहेत.





