pakistan Court Martial : पाकिस्तानी लष्कराकडून कोर्ट मार्शल; दोन निवृत्त अधिकाऱ्यांना 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

pakistan Court Martial : पाकिस्तानी लष्कराने कोर्ट मार्शल केल्यानंतर आपल्या दोन निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांना शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानी लष्कराने या दोन माजी अधिकाऱ्यांना 12 आणि 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असल्याची माहिती समोर आली आहे.
मेजर (निवृत्त) आदिल फारुक राजा आणि कॅप्टन (निवृत्त) हैदर रझा मेहंदी अशी पाकिस्तानी लष्कराने शिक्षा सुनावलेल्या दोन माजी अधिकाऱ्यांची नावे आहेत. या दोघांना ठोठावण्यात आलेल्या शिक्षेमुळे ९ मे रोजी सुरू झालेल्या हिंसाचारातील आरोपींच्या खटल्यांची सुनावणी सुरू झाली आहे.
मेजर (निवृत्त) आदिल फारुख राजा आणि कॅप्टन (निवृत्त) हैदर रझा मेहंदी हे दोघेही आरोपी परदेशात राहतात. हे दोघेही पाकिस्तानी लष्कराच्या सध्याच्या वरिष्ठ नेतृत्वाचे ‘विरोधक’ मानले जातात. कोर्ट मार्शलवेळी दोघेही हजर नव्हते.
पाकिस्तानी लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, दोघांनाही पाकिस्तान आर्मी अॅक्ट, 1952 च्या फील्ड जनरल कोर्ट मार्शल (FGCM) अंतर्गत दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आहे. या दोघांवर पाकिस्तानी लष्कराच्या जवानांमध्ये देशद्रोहासाठी चिथावणी दिल्याचा आरोप आहे.
निवेदनात पाकिस्तानी लष्कराने, दोघांनीही ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट, 1923 च्या तरतुदींचे उल्लंघन केले आहे. ही तरतूद हेरगिरी आणि पाकिस्तानच्या सुरक्षेशी आणि हिताशी संबंधित आहे. मेजर राजाला 14 वर्षांची सश्रम कारावासाची तर कॅप्टन मेहंदीला 12 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.





