Pakistan : इम्रान खान यांना ‘त्या’ 8 प्रकरणात जामीन मंजूर

इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दहशतवाद विरोधी न्यायालयाकडून 8 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 8 जूनपर्यंत हंगामी जामीन मंजूर झाला आहे. ही प्रकरणे मार्च महिन्यात ज्युडिशियल कॉम्प्लेक्सच्या आवारातील हिंसाचाराशी संबंधित आहेत.
तोशाकाना प्रकरणी इम्रान सुनावणीला उपस्थित झाले असताना हा हिंसाचार झाला होता. या हिंसाचारामध्ये सुमारे 25 सुरक्षा रक्षक जखमी झाले होते.
दुसरीकडे इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बिबी यांनाही अल कादिर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणी उत्तरदायित्व न्यायालयाने 31 मे पर्यंत अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने बुशरा बिबी यांना 5 लाख रुपयांची हमी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
तपास अधिकाऱ्यांनी पुराव्यांची शहानिशा करावी आणि तपास पुढे सुरू ठेवावा, अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे. यापूर्वी लाहोर उच्च न्यायालयाने बुशरा बिबी यांना 23 मे पर्यंतचा हंगामी जामीन मंजूर केला होता.





