सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे पाकिस्तान कनेक्शन ; कोण आहे नारायण सिंह चौडा?, का केला त्यांनी हल्ला?

Sukhbir Singh Badal । शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल यांच्यावर आज पंजाबच्या अमृतसरमध्ये हल्ला करण्यात आला. सकाळी नऊच्या सुमारास सुखबीर बादल सेवा करत असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. मात्र त्यात ते थोडक्यात बचावले आहेत.
दरम्यान, घटनास्थळी उपस्थित लोकांनी गोळी झाडणाऱ्या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दुसरीकडे सुखबीर बादल सुरक्षित आहेत. गुरुद्वारामध्ये श्री अकाल तख्त साहिबने दिलेली धार्मिक शिक्षा भोगण्यासाठी ते श्री हरमंदिर साहिबला पोहोचले होते. बादल यांच्यावर गोळीबार करणारा आरोपी नेमका कोण आहे?, त्याने का हल्ला केला याविषयी आपण जाणून घेऊया…
आरोपी खलिस्तानी दहशतवादी Sukhbir Singh Badal ।
मिळालेल्या माहितीनुसार, नारायण सिंह चौडा असे आरोपीचे नाव आहे. इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, तो खलिस्तान लिबरेशन आर्मी (आता निकामी झालेला) या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. तुरुंगातून पलायन केल्याप्रकरणी त्याने यापूर्वीच शिक्षा भोगली आहे.
पाकिस्तानशीही संबंध Sukhbir Singh Badal ।
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो 1984 मध्ये पाकिस्तानला गेला होता. त्याठिकाणी त्याने पंजाबमध्ये शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांच्या मोठ्या मालाची तस्करी करण्यास मदत केली. पाकिस्तानात राहत असताना त्यांनी गनिमी युद्ध आणि देशद्रोहाचे साहित्य यावर एक पुस्तक लिहिले आहे. बुडैल जेलब्रेक प्रकरणातीलही तो आरोपी आहे. नारायणने यापूर्वी पंजाब तुरुंगात शिक्षा भोगली आहे.
मी बरेच दिवस रेकी करत होतो
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नारायण सिंह चौडा मंगळवारी श्री हरमंदिर साहिबमध्ये फिरताना दिसला. गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर पोलीसही सतर्क झाले आणि त्याच्यावर लक्ष ठेवून होते. सुखबीर बादल यांच्या सुरक्षेत पोलिसांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप अकाली नेत्यांनी केला. दरम्यान, एडीसीपी हरपाल सिंह यांनी सांगितले की, कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. हल्लेखोर कालही येथे होता. आज त्यांनी प्रथम गुरुजींना नमन केले. त्यानंतर त्याने हा हल्ला केला.





