Pakistan-China Trade Route : पाक-चीन व्यापारी मार्ग सलग पाचव्या दिवशी बंद

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये पाकिस्तान-व्याप्त गिलगिट-बाल्टिस्तानच्या पर्वतीय प्रदेशात दीर्घकाळ वीज खंडित झाल्याबद्दल हजारो लोकांनी निदर्शने सुरू केली आहेत. या बेमुदत धरणे आंदोलनामुळे काल पाचव्या दिवशी चीनसोबतचा महत्त्वाचा व्यापारी मार्ग ठप्प राहिला. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार हुंझा शहरातील हुंझा आवामी ऍक्शन कमिटी आणि सर्वपक्षीय व्यापारी संघटना या निदर्शनाच्या आयोजकांनी व्यक्त केला आहे.
रॅलीच्या नेत्यांनी शहराच्या सततच्या अपुऱ्या वीज पुरवठ्यावर भर दिला, कडाक्याच्या थंडीच्या काळात रहिवाशांना 23 तास वीजपुरवठा खंडित होतो,याकडे या नेत्यांनी लक्ष वेधले आहे. या कडाक्याच्या थंडीमध्ये महिला आणि लहान मुले देखील या धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलकांशी वाटाघाटी करून धरणे आंदोलन मागे घेण्यास लावण्याचे सरकारचे आतापर्यंतचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.
हुंझामधील वीजपुरवठा सुधारण्यासाठी गिलगीट-बाल्टीस्तान सरकारकडून त्वरित पावले उचलली जातील, असे आश्वासन उपायुक्तांकडून आंदोलकांना देण्यात आले होते. मात्र आंदोलकांनी ही ऑफर नाकारली आणि हे खोटे आश्वासन असल्याचे सांगितले. अशी आश्वासने यापूर्वीही दिली गेली होती परंतु त्याची अंमलबजावणी कधीच झाली नाही, असेही आंदोलकांनी म्हटले आहे.
चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) ड्राय पोर्टमध्ये आयात आणि निर्यातीने भरलेल्या वाहनांसह ७०० ट्रक या धरणे आंदोलनामुळे अडकले आहेत, असे गिलगिट-बाल्टिस्तान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष इम्रान अली म्हणाले. पाकिस्तान आणि चीनदरम्यानच्या व्यापाराला सोय व्हावी म्हणून ड्राय पोर्टची १९८५ साली स्थापना करण्यात आली. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरला जोडण्याचा हा महत्वाचा दुवा आहे.





