ट्रम्प यांचं नक्की चाललयं काय? आता पाकसह ‘या’ 41 देशांना दिला धक्का, अमेरिकेत प्रवास बंदी घालण्याच्या तयारीत

Donald Trump | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून टॅरिफ ते बेकायदेशीर प्रवाशांपर्यंत अनेक मुद्यांवरून कठोर भूमिका घेताना दिसत आहेत. आता ट्रम्प नवीन प्रवास बंदी धोरण आणण्याचा विचार करत आहेत. यानुसार, जगभरातील 41 देशांच्या नागरिकांवर अमेरिकेत प्रवास करण्यासाठी कठोर नियम लादले जाऊ शकतात.
हे धोरण विशेषतः अशा देशांवर परिणाम करू शकते जिथे अमेरिका सुरक्षा तपासणी आणि स्क्रीनिंग प्रक्रियेला फारसे महत्त्व दिले जात नाही. यामध्ये भारताचे शेजारील देश पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि म्यानमार यांचाही समावेश आहे. याचा उद्देश राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणे असल्याचे सांगितले जात आहे.
यासंदर्भात एक मेमो तयार करण्यात आला आहे. या मेमोमध्ये एकूण 41 देशांना तीन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागण्यात आले आहे. 10 देशांच्या पहिल्या गटात अफगाणिस्तान, इराण, सीरिया, क्युबा आणि उत्तर कोरिया यांचा समावेश आहे. या देशातील नागरिकांचा व्हिसा पूर्णपणे निलंबित केला जाईल.
दुसऱ्या गटात इरिट्रिया, हैती, लाओस, म्यानमार आणि दक्षिण सुदानसह पाच देशांना अंशतः निलंबनाचा सामना करावा लागेल. यामुळे पर्यटक आणि विद्यार्थी व्हिसा तसेच काही अपवादांसह इतर स्थलांतरित व्हिसांवर परिणाम होईल. तिसऱ्या यादीमध्ये पाकिस्तान, भूतान आणि म्यानमारसह एकूण 26 देशांचा समावेश आहे. येथील सरकारने 60 दिवसांच्या आत त्रूटी दूर न केल्यास अमेरिकेकडून व्हिसा देण्यावर अंशतः बंदी घालण्याचा विचार केला जाईल.
सध्या हे धोरण विचारधीन आहे. या यादीमध्ये बदल देखील केला जाऊ शकतो. दरम्यान, ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात काही देशांच्याबाबतीत अशाचप्रकारचे धोरण राबवण्यात आले होते.





