Pakistan Attack : पाककडून भारतावर ‘या’ 3 ठिकाणी हल्ला; भारतीय सैन्यांकडून सडेतोड प्रत्युत्तर

राजस्थान : भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानकडून भ्याड हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तानकडून जम्मू, राजस्थान आणि पंजाबच्या सीमेजवळ हल्ला करण्यात आला आहे. राजस्थानमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानचं F16 फायटर जेट पाडलं असल्याचे समोर आले आहे.
तसेच पठाणकोट, उधमपूर आणि कुपवाडा जिल्ह्यातल्या सीमाभागात पाकिस्तानने गोळीबार केल्याचे समोर आले आहे. पठाणकोट हवाई अड्ड्यावर मोठ्या प्रमाणात पाकिस्तानचे ड्रोन घिरट्या घालत होते. भारतीय लष्कराच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी काही मिनिटांत सगळे ड्रोन निष्क्रिय केले. यानंतर खबरदारी म्हणून भारतीय लष्कर प्रशासनाने तत्काळ निर्णय घेत संपूर्ण जम्मूत ब्लॅकआऊट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डिफेन्स कॉलॉनी आणि जम्मू विमानतळाच्या परिसरात बॉम्फस्फोट झाले आहेत. पाकिस्तानने पुन्हा एक भारतावर हल्ला केला आहे. सीमा रेषेपासून दूर असलेल्या जम्मू विमानतळावर ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. पण भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर देऊन ड्रोन हल्ला हाणून पाडला आहे.
काही दिवसांपूर्वी भारतातील पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता. याला भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवून जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानाश्रित दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून भारताने पाकचे चांगलेच कंबरडे मोडले. यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने सीमेपलीकडून अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून १६ भारतीय नागरिकांना मारले. तसेच भारताच्या 3 राज्यातील 15 शहरांवर हल्ला करण्याचे नियोजन केले.





