“आम्ही हिंदूंपेक्षा वेगळे, कलमाच्या आधारावर पाकिस्तानची निर्मिती” ; लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे द्वेषपूर्ण भाषण

Pakistan Army Chief Asim Munir । पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी इस्लामाबाद आयोजित परदेशातील पाकिस्तानींच्या पहिल्या वार्षिक मेळाव्यात हिंदू धर्माविरोधात द्वेष पसरवणारे आणि भावनिक आवाहन करणारे भाषण दिले. १६ एप्रिल रोजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासह पाकिस्तानच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुनीर यांनी परदेशातील पाकिस्तानींची निष्ठा आणि आर्थिक योगदान मिळवण्याचा प्रयत्न केला.
पाकिस्तान हिंदूंपेक्षा पूर्णपणे वेगळा Pakistan Army Chief Asim Munir ।
भारताच्या फाळणीचा उल्लेख करताना मुनीर म्हणाले, “पाकिस्तानची कहाणी आपल्या पुढच्या पिढ्यांना सांगितली पाहिजे, जेणेकरून ते आपले मूळ विसरणार नाहीत.” त्यांनी हिंदू धर्म आणि संस्कृतीपासून पाकिस्तान पूर्णपणे वेगळा असल्याचा दावा केला. “आपला धर्म, चालीरीती, परंपरा, विचार आणि महत्त्वाकांक्षा हिंदूंपासून वेगळ्या आहेत. यातूनच द्विराष्ट्र सिद्धांताचा पाया रचला गेला,” असे त्यांनी यावेळी सांगितले. मात्र, बांगलादेशच्या स्वातंत्र्याचा इतिहास आणि द्विराष्ट्र सिद्धांताच्या मर्यादा त्यांनी सोयीस्करपणे वगळल्या.
परदेशातील पाकिस्तानींच्या आर्थिक योगदानावर लोभस नजर ठेवत मुनीर म्हणाले, “तुम्ही पैसे पाठवून, गुंतवणूक करून देशाला बळ देत आहात. तुम्ही श्रेष्ठ विचारसरणीचे प्रतिनिधित्व करता.” त्यांनी अल्लामा इक्बाल यांच्या कवितेचा आधार घेत उपस्थितांना भावनिक आवाहन केले. याविषयी बोलताना, “पाकिस्तानची कहाणी कधीही विसरू नका. तुमच्या पुढच्या पिढ्यांना त्यांचे पाकिस्तानशी नाते कायम ठेवायला शिकवा.” असे आवाहन त्यांनी केले.
“पाकिस्तानी लोकांचे हृदय गाझाच्या मुस्लिमांसोबत Pakistan Army Chief Asim Munir ।
पाकिस्तानच्या निर्मितीला धार्मिक रंग देत मुनीर यांनी दावा केला की, “मानवजातीच्या इतिहासात फक्त दोनच राज्ये लेखणीच्या पायावर उभी आहेत, मदीना आणि पाकिस्तान.” फाळणीतील हिंसाचार आणि दंगलींचा इतिहास दडपत त्यांनी पाकिस्तानला इस्लामिक आदर्शांशी जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गाझातील पॅलेस्टिनींसाठी समर्थन व्यक्त केले आणि म्हणाले, “पाकिस्तानी लोकांचे हृदय गाझाच्या मुस्लिमांसोबत आहे.”
पाकिस्तानच्या आर्थिक संकटाचा उल्लेख करताना त्यांनी जम्मू-काश्मीरचा जुना मुद्दा पुन्हा उपस्थित केला आणि त्याला “पाकिस्तानची गळ्यातील नस” म्हटले. काश्मीर आणि बलुचिस्तानचा उल्लेख करत परदेशातील पाकिस्तानींच्या निष्ठेचा आणि आर्थिक योगदानाचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी परदेशातील पाकिस्तानींना देशासाठी अधिक योगदान देण्याचे आवाहन केले. “मुल्ला जनरल” म्हणून ओळखले जाणारे मुनीर यांनी आपल्या भाषणात हिंदूंविरोधातील द्वेष, धार्मिक भावना आणि परदेशातील पाकिस्तानींच्या संपत्तीवर लक्ष केंद्रित करत पाकिस्तानच्या आर्थिक आणि राजकीय अजेंड्याला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला.





