पाकिस्तानात विमान प्रवासाचे वाजणार बारा ! एअरलाइन्स दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

नवी दिल्ली – पाकिस्तानची वाईट अवस्था सध्या सर्वश्रुत आहे. सध्या पाकिस्तान गरिबी आणि उध्वस्त अर्थव्यवस्थेशी झगडत असून देशात महागाईही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा परिणाम पाकिस्तानची सर्वात मोठी एअरलाइन पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सवरही होत आहे. ताज्या माहितीनुसार, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आहे.
पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या विमान कंपनीकडे इंधन भरण्यासाठी पैसेही शिल्लक नाहीत. यामुळे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे एक विमान नुकतेच सौदी अरेबियातील दममान विमानतळावर थांबविण्यात आले आणि इतर चार विमाने संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधील दुबई विमानतळावर थांबविण्यात आली. विमान कंपन्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतरच विमानांना उड्डाण करण्यास परवानगी देण्यात आली. दोन्ही देश पाकिस्तानचे मित्र मानले जातात, पण असे असतानाही परदेशात पाकिस्तानचा अपमान झाला.
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स ही देशातील सरकारी आणि सर्वात मोठी विमान कंपनी आहे. मात्र असे असूनही ती गरिबीशी झुंजत आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की अनेक उड्डाणे रद्द करण्यात येत आहेत. शिवाय कर्मचाऱ्यांचे पगारही बंद केले जात आहेत. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सकडे अनेक देशांच्या विमानतळ प्राधिकरणांना देय असलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम थकली आहे.
खराब परिस्थितीचा सामना करत असलेल्या पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सनेही पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीकडे मदतीचे आवाहन केले आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सने सुमारे 2290 कोटी रुपयांची मदत मागितली आहे, परंतु त्यांची विनंती फेटाळण्यात आली आहे.





