PAK vs SA 3rd ODI : पाकिस्तानने रचला इतिहास..! दक्षिण आफ्रिकेचा 3-0 ने सूपडा साफ करत केला मोठा विश्वविक्रम…

PAK vs SA 3rd ODI : तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला व्हाईटवॉश दिला आहे. मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात पाकिस्तानने डकवर्थ लुईस नियमानुसार 36 धावांनी विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तानने विश्वविक्रम केला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच भूमीवर व्हाईटवॉश देणारा पाकिस्तान हा जगातील पहिला संघ ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेला वनडे क्रिकेटच्या 33 वर्षांच्या इतिहासात कोणीही क्लीन स्विप दिलेला नाही. दक्षिण आफ्रिकेने 1991-92 मध्ये पहिली एकदिवसीय मालिका खेळली. त्यानंतर पहिल्यांदाच घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेत त्यांना क्लीन स्वीप मिळाला आहे.
पाकिस्तानने पहिल्या सामन्यात 3 गडी राखून, दुसऱ्या सामन्यात 81 धावांनी, तर तिसऱ्या सामन्यात 36 धावांनी विजय मिळवला आहे. आता पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. ही मालिका दक्षिण अफ्रिकेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.
Excellent display by the boys 🇵🇰✨
A 36-run victory in the final ODI to complete a series sweep! ✅#SAvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/T6pO8PK6sO
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 22, 2024
पाकिस्तानचा दुसरा धमाका….
क्लीन स्वीपसह, पाकिस्तान दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय मालिका एकदा नव्हे तर तीनदा जिंकणारा पहिला आशियाई संघ बनला आहे. 2024 पूर्वी पाकिस्तान संघाने 2013 आणि 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिकाही जिंकली आहे.
मालिकेत सॅम अयुब चमकला…
पाकिस्तानच्या सॅम अयुबला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ आणि ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ असे दोन्ही पुरस्कार मिळाले. दोन शतकांसह तो या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होता. त्याने तीन डावात 78.33 च्या सरासरीने 235 धावा केल्या. तर दुसरीकडे आफ्रिकेचा हेनरिक क्लासेन तीन डावात 88 च्या सरासरीने 264 धावा करून या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.
असा झाला तिसरा सामना….
मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने हा पराक्रम केला. पाकिस्तान आणि आफ्रिका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना जोहान्सबर्ग येथे खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानकडून प्रथम फलंदाजी आणि नंतर उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला, ज्यामुळे डीएलएस पद्धत वापरली गेली.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी अजिबात योग्य ठरला नाही. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 47 षटकांत 9 बाद 308 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. पावसामुळे संघाला 47 षटकांचीच फलंदाजी करता आली. यादरम्यान संघासाठी सलामीला आलेल्या सॅम अय्युबने शानदार खेळी करत 94 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 101 धावा केल्या. याशिवाय कर्णधार मोहम्मद रिझवान आणि माजी कर्णधार बाबर यांनी अर्धशतके झळकावली. बाकी सलमान आघाने चांगली खेळी केली. कर्णधार रिझवानने 52 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 53 धावा तर बाबरने 71 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. बाकी सलमान आघाने 33 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 53 धावांची महत्वपूर्ण खेळी केली.
दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने तीन बळी घेतले. तर मार्को जॅनसेन आणि ब्योर्न फोर्टुइन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. माफाका आणि कॉर्बिन बॉश यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला डीएलएस अंतर्गत 47 षटकांत केवळ 308 धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र, संघ 42 षटकांत 271 धावांत गडगडला. संघासाठी यष्टीरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेनने 43 चेंडूंत 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 81 धावांची शानदार खेळी केली. मात्र, त्याची खेळी संघाच्या विजयासाठी पुरेशी ठरली नाही. त्याचवेळी कोर्बिनने 44 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने नाबाद 40 धावा केल्या. टोनी डी जॉर्जीने 26 धावा, कर्णधार टेम्बा बावुमाने 8 धावा तर रॅसी व्हॅन डर डुसेनने 35 धावा केल्या. एडन मार्कराम 19 तर डेव्हिड मिलर 3 धावा करून बाद झाला. यान्सेनने 26 धावा , फॉर्च्युइनने 8 धावा तर मफाकाला खातेही उघडता आले नाही. पाकिस्तानकडून सुफियान मुकीमने चार बळी घेतले. तर शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. मोहम्मद हसनैन आणि सॅम अयुबला प्रत्येकी एक विकेट मिळाली.





