PAK vs BAN Test Series 2024 : पाकिस्तान संघाला तगडा धक्का, मॅचविनर खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर…

Pakistan vs Bangladesh Test Series 2024 : पाकिस्तान क्रिकेट संघ शान मसूदच्या नेतृत्वाखाली येत्या 21 ऑगस्टपासून रावळपिंडीच्या मैदानावर बांगलादेशविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानी संघाला त्यांचा मॅचविनर अष्टपैलू खेळाडू आमेर जमालच्या रूपाने मोठा फटका बसला आहे. वास्तविक आमेर जमाल याला पाठीच्या दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. पीसीबी म्हणजेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोमवारी सोशल मिडियावरून आमेर जमालला वगळल्याची माहिती दिली आहे.
आमेर जमालने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात चांगली केली, ज्यामध्ये त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकूण 18 विकेट घेतल्या होत्या. जमालच्या दुखापतीबद्दल बोलायचे झाले तर मे महिन्यापासून तो त्याच्याशी झगडत आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा झाली होती, त्यावेळी जमालला प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट करण्याबाबतचा निर्णय त्याच्या फिटनेसच्या आधारावर घेतला जाईल, असे सांगण्यात आले होते.
Aamir Jamal released from Test squad
Read more ➡️ https://t.co/uSrWIqmCmx#PAKvBAN
— PCB Media (@TheRealPCBMedia) August 19, 2024
आधी असे वाटत होते की, तो दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करेल पण आता त्याला या संपूर्ण मालिकेतून बाहेर व्हावे लागत आहे. या मालिकेतील पाकिस्तानी संघातील जमाल हा एकमेव वेगवान अष्टपैलू खेळाडू होता. दरम्यान, आमेरच्या जागी बदली खेळाडूच्या नावाची घोषणा पीसीबीकडून अद्याप करण्यात आलेली नाही. जमाल पूर्णपणे तंदुरुस्त होईपर्यंत तो लाहोरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये राहून त्याच्या फिटनेसवर काम करेल,अशीही माहिती पीसीबीकडून देण्यात आली आहे.
पहिल्या कसोटीत पाकिस्तान उतरू शकतो वेगवान गोलंदाजीसह….
पाकिस्तानला बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील दोन्ही कसोटी सामने रावळपिंडीच्या मैदानावर खेळायचे आहेत. यामध्ये संघ पहिल्या कसोटीत कोणत्याही फिरकी गोलंदाजाशिवाय खेळण्याचा निर्णय घेऊ शकतो. या स्थितीत शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांच्याशिवाय मीर हमजा, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अली यांना प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळू शकते.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक…
पहिला सामना : 21 ते 25 ऑगस्ट, रावळपिंडी
दुसरा सामना : 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, रावळपिंडी

