PAK vs BAN, 1st Test 2024 : बांगलादेशविरुद्धच्या पराभवाने पाकिस्तानला मोठा धक्का, WTC पॉइंट टेबलमध्ये मोठा उलटफेर…

WTC Points Table : पाकिस्तानविरुद्धच्या विजयामुळे बांगलादेश संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा फायदा झाला आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने रविवारी पाकिस्तानविरुद्ध 10 गडी राखून विजय मिळवून गुणतालिकेत सहावे स्थान मिळवले. त्याचबरोबर इंग्लंडनेही श्रीलंकेविरुद्धच्या विजयासह मोठी झेप घेण्यात यश मिळवले आहे.
बांगलादेशला विजयाचा फायदा…
पाकिस्तानविरूध्दच्या या विजयासह बांगलादेशचा संघ सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या गुणांची टक्केवारी 40 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर बांगलादेशच्या खात्यात 24 अंक पोहोचले आहेत. यापूर्वी संघ आठव्या स्थानावर होता. त्याचवेळी या पराभवामुळे पाकिस्तान संघाचे नुकसान झाले आहे. संघ सातव्या स्थानावरून आठव्या स्थानावर घसरला आहे. त्याच्या खात्यात 22 गुण आहेत आणि गुणांची टक्केवारी 30.56 आहे.
इंग्लंडची मोठी झेप…
दुसरीकडे, इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाच गडी राखून विजय मिळवत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. ओली पोपच्या नेतृत्वाखालील संघाने श्रीलंकेचा पराभव करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
ENG vs SL 1st Test : जो रूटची लढाऊ खेळी, इंग्लंडचा श्रीलंकेवर पाच गडी राखून विजय….
या चक्रातील 14 कसोटी सामन्यांमधील इंग्लंडचा हा सातवा विजय आहे. यासह त्याचे गुण 69 इतके वाढले असून गुणांची टक्केवारी 41.07 झाली आहे. इंग्लंडचा संघ आता चौथ्या स्थानावर पोहोचला असून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याची शक्यता वाढली आहे. यापूर्वी संघ सहाव्या क्रमांकावर होता. इंग्लंडविरूध्दच्या पराभवानंतर श्रीलंका (गुणांची टक्केवारी 40) पाचव्या क्रमांकावर आहे.
PAK vs BAN 1st Test : बांगलादेशचा ऐतिहासिक विजय, पाकला 10 विकेट्सने पराभूत करत रचला इतिहास…
भारत अव्वल स्थानावर कायम…
भारत आणि गतविजेता ऑस्ट्रेलिया अनुक्रमे 68.5 आणि 62.5 गुणांसह अव्वल दोनमध्ये कायम आहेत. भारतीय संघाला सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईत होणार आहे. तर, दुसरा सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये होणार आहे. यानंतर नोव्हेंबरमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात प्रतिष्ठेच्या पाच सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जाईल.





