वेदनादायी वास्तव ! ॲम्बुलन्स नसल्याने चिमुकल्या लेकरांचे मृतदेह खांद्यावर घेऊन आई-वडिलांना करावी लागली 15 किलोमीटर पायपीट

Gadchiroli News| गडचिरोलीतील काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथे आजोळी गेलेल्या दोन्ही लहान मुलांना अचानक ताप आल्याने आई- वडिलांनी त्यांना दवाखान्याऐवजी पुजाऱ्याकडे नेले. मात्र दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली आणि दोघांनीही आपला जीव गमवावा लागला.
परंतु या भागात रस्त्यांची स्थिती बिकट आहे. शववाहिका पोचत नसल्याने पालक दोन्ही मृतदेह खांद्यावर टाकून 15 किमीपर्यंत चालत त्यांच्या गावाला पोहोचले आहे. गडचिरोलीतील अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथील दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेचे वेदनादायी वास्तव मांडणारी ही घटना बुधवारी घडली.
नेमकं काय घडलं?
दोघे चिमुकले दोन दिवसांपूर्वी आई-वडिलांसोबत पत्तीगावला आले होते. याच सुमारास बाजीरावला ताप आला. पाठोपाठ दिनेशही आजारी पडला. आईवडिलांनी त्यांना पत्तीगाव परिसरातील एका पुजाऱ्याकडे नेले. तिथे त्यांना जडीबुटी देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच दोघांचीही प्रकृती अधिकच खालावली. सकाळी साडेदहा वाजता बाजीरावचा मृत्यू झाला. त्यानंतर दुपारी १२ वाजता दिनेशनेही प्राण सोडले.
त्यानंतर दोन्ही मुलांना घेऊन दाम्पत्य जिमलगठ्ठा प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन मृत घोषित केले. यावेळी आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नव्हती, त्यामुळे देचलीपेठाहून रुग्णवाहिका बोलावण्याची तयारी केली, पण दोन्ही चिमुकले गमावलेल्या वेलादी दापत्याने मदत नाकारत दोघांना खांद्यावर घेऊन जड पावलांनी पुढची वाट धरली.
‘दोन चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाल्याची माहिती खरी आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट आहे. या चिमुकल्यांना आधी पुजाऱ्याकडे नेले होते. आरोग्य केंद्रात येण्यापूर्वीच ते मृत्युमुखी पडलेले होते. रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, पण नातेवाइकांनी ऐकले नाही. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल मागविण्यात येईल,’ अशी माहिती गडचिरोलीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी दिली आहे.
हेही वाचा:
बदलीच्या रिंगणात बजरंग पुनियाला ताकद दाखवणारे काँग्रेसचे आमदार कुलदीप वत्स कोण ?





