Pahalgam Terror Attack । जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. आता या हल्ल्याच्या एका प्रत्यक्षदर्शीने राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) दिलेली माहिती धक्कादायक आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या साक्षीदाराने,” हल्ल्यानंतर तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आनंद साजरा करण्यासाठी हवेत चार राउंड गोळीबार केला” अशी खळबळजनक माहिती दिली आहे. साक्षीदाराला ‘स्टार प्रोटेक्टेड विटनेस’चा दर्जा Pahalgam Terror Attack । तपास संस्थांनी या स्थानिक प्रत्यक्षदर्शीला स्टार प्रोटेक्टेड विटनेस म्हणून घोषित केले आहे. एनआयएने जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि केंद्रीय गुप्तचर संस्थांच्या मदतीने हा साक्षीदार शोधला. हल्ल्यानंतर ही व्यक्ती घटनास्थळाजवळ होती आणि तो दहशतवाद्यांशी समोरासमोर आला. एका तपास अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “दहशतवाद्यांनी त्याला थांबवले आणि कल्मा म्हणण्यास सांगितले. त्याने स्थानिक काश्मिरी भाषेत कल्मा म्हणला, ज्यामुळे दहशतवाद्यांना त्याच्यावर संशय आला नाही आणि ते त्याला सोडून गेले. त्यानंतर लगेचच त्यांनी हवेत चार राउंड गोळीबार केला.” साक्षीदाराच्या वक्तव्याच्या आधारे, एनआयएने घटनास्थळावरून चार रिकामे काडतुसे जप्त केली आहेत. स्थानिक मदतनीसांची भूमिकाही समोर Pahalgam Terror Attack । साक्षीदाराने असेही सांगितले की त्याने परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद नावाच्या दोन स्थानिक लोकांना डोंगराळ भागात दहशतवाद्यांचे सामान हाताळताना पाहिले होते. काही वेळाने दहशतवादी सामान घेऊन निघून गेले. तपासात असे दिसून आले आहे की परवेझ आणि बशीर यांना दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली आधीच अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारे हल्ला करण्याचे नियोजन केले होते समोर आलेली माहितीनुसार, २१ एप्रिल रोजी दुपारी ३:३० वाजता तीन पाकिस्तानी दहशतवादी परवेझच्या घरी पोहोचले. तेथे त्यांनी चार तास संपूर्ण परिसराची रिकेस केली, ज्यामध्ये त्यांनी सुरक्षा व्यवस्था, पर्यटन स्थळे आणि मार्गांची माहिती गोळा केली. जाताना त्यांनी परवेझच्या पत्नीकडून मसाले आणि तांदूळ पॅक केले आणि त्याला ५०० रुपयांच्या पाच नोटा दिल्या. नंतर त्यांनी बशीरला भेटले आणि २२ एप्रिल रोजी दुपारी १२:३० वाजता तयार राहण्यास सांगितले. सुलेमान शाहची भूमिका संशयास्पद एनआयएला संशय आहे की, बोगदा प्रकल्पावर काम करणाऱ्या ७ कामगारांच्या हत्येत सहभागी असलेल्या लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी सुलेमान शाहने या हल्ल्यात भूमिका बजावली आहे. तपासाची व्याप्ती वाढवली एनआयए आता या हल्ल्यामागील संपूर्ण दहशतवादी नेटवर्क, स्थानिक सहयोगी आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांशी असलेल्या संबंधांची चौकशी करत आहे. लष्कर-ए-तोयबाशी संबंध आधीच पुष्टी झाले आहेत.