Pahalgam Attack : “पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही”; पाकिस्तानचं मोठं विधान, वाचा सविस्तर….

Pahalgam terrorist attack | Pakistan – पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानशी संबंध असल्याचा भारताने केलेला दावा पाक संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने फेटाळून लावला आहे. या आशयाचा एक ठराव पाकिस्तानच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये करण्यात आला आहे. पहलगाम हल्ल्याचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा भारताने केलेला दावा निरर्थक आणि बिनबुडाचा असल्याचे या ठरावामध्ये म्हटले आहे.
पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २६ पर्यटक ठार झाले होते. पाकिस्तानमधील लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित द रेसिस्टन्स फ्रंट या गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
पाक संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये उपपंतप्रधान इसाक दर यांनी या ठराव मांडला. अपेक्षेप्रमाणे संसदेतील सर्व पक्षांच्या सदस्यांनी या ठरावाला पाठिंबा दिला. पाकिस्तान कोणत्याही आक्रमणापासून आपल्या सार्वभौमत्वाचे आणि भौगोलिक एकात्मतेचे रक्षण करण्यास पुर्ण सक्षम आणि तयार आहे.
जल दहशतवादा किंवा लष्करी कुरापतींना तोंड देण्यास पाकिस्तान सक्षम आहे, असे या ठरावामध्ये म्हटले आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानशी संबंध जोडणारा दावा बिनबुडाचा आणि निरर्थक असल्याचे सांगून तो फेटाळण्यात आला आहे. त्याचबरोबर निरपराध नागरिकांची हत्या ही पाकिस्तान मानत असलेल्या मूल्यांच्या विरोधात असल्याचेही या ठरावामध्ये म्हटले गेले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानशी जोडण्याचा भारताचा प्रयत्न पाकिस्तानची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. भारताकडून नेहमीच दहशतवादाच्या मुद्द्याचा वापर संकुचित राजकारणासाठी केला जातो.
तसेच सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या भारताची घोषणा युद्ध छेडण्याची कृती असल्याची टीका देखील या ठरावामध्ये करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या घडामोडींची माहिती परराष्ट्र मंत्रलयाकडून २६ देशांच्या राजदूतांना देण्यात आली असल्याचेही दर यांनी संसदेत ठराव मांडण्यापुर्वी सांगितले.
भारताला प्रत्युत्तर देण्याची दर्पोक्ती देखील दर यांनी यावेळी व्यक्त केली. भारताकडून जर कोणतीही लष्करी आगळीक केली गेली, तर त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी पाकिस्तानच्या लष्कराने केली आहे. पुर्वी देखील पाक लष्कराने भारताला तसास तसे प्रत्युत्तर दिले होते, असेही दर म्हणाले.
पहलगाम हल्ल्यानंतर लगेच पाकिस्तानातील वरिष्ठ सनदी आणि लष्करी नेत्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा कमिटीची बैठक झाली होती. सिमला करार आणि भारताबरोबरचे अन्य द्विपक्षीय करार स्थगित करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला होता.
तसेच भारताबरोबरचे सर्व व्यापारी संबंध निलंबित केले गेले आणि भारताच्या विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद करण्यात आली होती. गुरुवारी पाकिस्तानने वाघा बॉर्डर देखील बंद केली सार्क व्हिसा सवलतींखाली भारतीयांना देण्यात आलेले व्हिसा रद्द देखील केले. भारताने बुधवारी सिंधू पाणी करार स्थगित केला आणि इस्लामाबादसोबतचे राजनैतिक संबंध कमी केले.





