संयुक्त राष्ट्रे : पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने दोन वेळा स्वीकारली आहे. या संघटनेने हल्ल्याच्या ठिकाणचे फोटो प्रसिद्ध केले आहेत, असे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या निर्बंध देखरेख पथकाने आपल्या अहवालामध्ये म्हटले आहे. पाकिस्तानस्थित लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेच्या मदतीशिवाय हा हल्ला करताच येऊ शकला नसता, असे देखील संयुक्त राष्ट्राच्या या पथकाने म्हटले आहे. इस्लामिक स्टेट, अल कायदा आणि संबंधित व्यक्ती आणि संस्थांच्या कारवायांवर देखरेख करणाऱ्या ऍनालिटिकल सपोर्ट ऍन्ड सॅन्क्शन्स मॉनिटरींग टीमने आपला ३६ वा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध केला. त्यामध्ये २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतरचे निरीक्षण नोंदवले आहे. दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील पर्यटन स्थळावर हा हल्ला केला होता आणि या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटक ठार झाले होते. हल्ला झाला, त्याच दिवशी आणि दुसऱ्या दिवशीही टीआरएफने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र टीआरएफने नंतर ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर टीआरएफने या संदर्भात काहीही वक्तव्य केले नव्हते. या गटाशिवाय अन्य कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही, असेही या संयुक्त राष्ट्राच्या निरीक्षक गटाच्या अहवालात म्हटले आहे. लष्कर ए तोयबा आणि टीआरएफचा काही संबंध असल्याचे सुरक्षा परिषदेतील एका देशाने नाकारले. तसेच लष्कर ए तोयबा निष्क्रीय असल्याचेही या देशाने म्हटले आहे. दहशतवादी गटांकडून या प्रादेशिक तणावाचा फायदा घेतला जाण्याचा धोका असल्याचे अहवालात नमूद केले गेले आहे. याच महिन्यात अमेरिकेने टीआरएफला परदेशी दहशतवादी संघटना आणि विशेष उल्लेखनीय जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. पहलगामच्या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने या हल्ल्याला जबाबदार, आयोजक, वित्तपुरवठादार आणि प्रायोजकांना उत्तरदायी ठरवून शिक्षा केली जायला हवी, असे निवेदन प्रसिद्ध केले होते. मात्र त्या निवेदनामध्ये टीआरएफचा उल्लेख नव्हता. सुरक्षा परिषदेमध्ये असलेल्या पाकिस्तानने निवेदनातून टीआरएफचा उल्लेख वगळला होता, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी संसदेत बोलताना सांगितले होते. इस्लामिक स्टेटचा धोका कायम… इस्लामिक स्टेट-खोरसान अजूनही सक्रिय असून मध्य आणि दक्षिण आशियामध्ये आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या संघटनेचा धोका कायम आहे, असेही संयुक्त राषअट्राच्या निरीक्षक गटाने आपल्या अहवालात म्हटले आहे. सुमारे २००० लढवय्यांसह इस्लामिक स्टेट खोरासानने अफगाणिस्तानच्या आत आणि बाहेर, मध्य आशियाई राज्ये आणि रशियन उत्तर काकेशससह, भरती सुरूच ठेवली असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.