बँकॉक : थायलंडच्या घटनापीठाने पंतप्रधान पेटोंगटार्न शिनावात्रा यांना निलंबित केले असून कंबोडियाचे अध्यक्ष हून सेन यांच्याशी फोनवरून केलेल्या संभाषणाची चौकशी पुर्ण होईपर्यंत त्यांना पदावरून निलंबित करण्यात आले आहे. हून सेन यांच्याबरोबर शिनावात्रा यांचे फोनवरील संभाषण उघड झाल्यापासून त्यांच्याविरोधात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. या संभाषणात शिनावात्रा यांनी कंबोडियाबरोबर २८ मे रोजी सीमेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी आपल्याच देशाच्या सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांवर टीका केली होती. त्याबरोबर आपल्यावर आपल्याच देशांतून टीका करणाऱ्यांवर आणि आरोप करणाऱ्यांवरही नाराजी व्यक्त केली होती. न्यायालयाने पेटोंगटार्न यांना त्यांच्या समर्थनार्थ पुरावे देण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. पेटोंगटार्न यांनी लगेच सरकारी निवासस्थान रिकामे केले असून कंबोडियाच्या अध्यक्षांबरोबरचे संभाषण उघड झाल्याबद्दल देशवासियांची माफी देखील मागितली आहे. आपण न्यायालयाच्या आदेशांचे पालन करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. विश्वासार्हतेचे आणि मूल्यांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली पेटोंगटार्न यांच्यावर घटनापीठासमोर खटला दाखल करण्यात आला होता. घटनापीठाच्या ९ सदस्यीय न्यायाधीशांपैकी ७ जणांनी त्यांच्या विरोधात तर २ जणांनी त्यांच्या बाजूने मतदान केले. पण त्यांनी विश्वासाचे उल्लंघन केल्याचे मत सर्व न्यायाधीशांनी एकमताने नोंदवले. उपपंतप्रधान आणि वाहतूक मंत्री असलेल्या सुरिया जुआंगरुंगरुआंगकिट हे हंगामी पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारतील, असे पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री चौसाक सिरिनिल म्हणाले. मंगळवारी, न्यायालयाने पेटोंगटार्न यांना निलंबित करण्यापूर्वी, लीक झालेल्या कॉलवरून एका प्रमुख पक्षाने आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर थायलंडचे राजे महा वजिरालोंगकोर्न यांनी मंत्रिमंडळात फेरबदलाला मान्यता दिली होती. या नवीन मंत्रिमंडळात पेटॉंगटार्न या सांस्कृतिक मंत्री म्हणून असणार आहेत. पेटोंगटार्न यांच्या निलंबनामुळे थायलंडमध्ये नव्याने अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. देशात आर्थिक मंदीचे वातावरण असतानाच पंतप्रधानांना निलंबित करण्यात आले आहे. पेटोंगटार्न आणि त्यांच्या फिऊ थाई पार्टीविरोधात मोठी नाराजी निर्माण झाली आहे. घराणेशाहीच्या राजकारणामुळे नाराजी… थायलंडचे लष्कर आणि घराणेशाहीच्या राजकारणाबाबत जनतेच्या मनात अस्वस्थता आहे. थायलंडचे माजी पंतप्रधान आणि पेटोंगटार्न शिनावात्रा यांचे वडील थाकसिन शिनावात्रा यांनीच ही घराणेशाहीची परंपरा सुरू केली होती. पेटोंगटार्न या शिनावात्रा कुटुंबातील तिसऱ्या पंतप्रधान आहेत. त्यांनाही वडिलांप्रमाणेच मुदत संपण्यापुर्वी पदावरून हटवले जाण्याची शक्यता आहे. थाकसिन यांना २००६ साली झालेल्या बंडानंतर पदावरून हटवले गेले आणि देशाबाहेर हाकलून दिले गेले होते. त्यांच्या भगिनी यूनग्लुक शिनावात्रा या नंतर पंतप्रधान झाल्या. पण त्यांनाही २०१४ च्या बंडानंतर न्यायालयाच्या आदेशाद्वारे पदावरून हटवण्यात आले होते.