Pune News : पद्मश्री डॉ. कोल्हे दाम्पत्यांची दुधभाते नेत्रालयाला सदिच्छा भेट; अत्याधुनिक नेत्रसेवा आणि ‘फिरता नेत्र दवाखाना’ उपक्रमाचे कौतुक
Pune News : या भेटी दरम्यान डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे या दोघांचीही आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने सविस्तर नेत्रतपासणी करण्यात आली. तपासणीसाठी वापरण्यात येणारे अद्ययावत तंत्रज्ञान, तपासणीची पद्धत तसेच रुग्णांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची त्यांनी माहिती घेतली.

पुणे : पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांनी डॉ. दुधभाते नेत्रालय व रेटिना सेंटरला सदिच्छा भेट देऊन तेथील अत्याधुनिक नेत्रतपासणी व उपचार सुविधांची माहिती घेतली. नेत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण आणि गरजू नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘फिरता नेत्र दवाखाना’ ( मोबाईल आय क्लिनिक) या उपक्रमाबद्दलही त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले.
या भेटी दरम्यान डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे या दोघांचीही आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने सविस्तर नेत्रतपासणी करण्यात आली. तपासणीसाठी वापरण्यात येणारे अद्ययावत तंत्रज्ञान, तपासणीची पद्धत तसेच रुग्णांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची त्यांनी माहिती घेतली.
नेत्रालयाचे संचालक व प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. अनिल दुधभाते यांनी कोल्हे दाम्पत्याचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच डोळ्यांचे आरोग्य व नेत्रविकारांविषयी माहिती देणारे आपले स्वलिखित ‘नेत्रकोष’ हे पुस्तक त्यांना भेट दिले. डॉ. दुधभाते नेत्रालयाच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून मोफत फिरता नेत्र दवाखाना उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून आतापर्यंत एक हजारांहून अधिक मोफत नेत्रतपासणी शिबिरे घेण्यात आली असून, ग्रामीण भागातील दहा हजारांहून अधिक शालेय विद्यार्थ्यांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ग्रामीण भागापर्यंत नेत्रआरोग्य सेवा पोहोचविणाऱ्या या उपक्रमाबद्दल कोल्हे दाम्पत्याने आनंद व्यक्त केला.
नेत्रालयातील विविध विभाग, वैद्यकीय उपकरणे, स्वच्छता आणि रुग्णसेवेची कार्यपद्धती यांचीही त्यांनी पाहणी केली. डॉक्टर व कर्मचारी रुग्णांशी आपुलकीने आणि संवेदनशीलतेने संवाद साधत असल्याचे नमूद करत त्यांनी कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले.
वाढती लोकसंख्या आणि प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर नेत्ररुग्णांना तपासणीपासून उपचारांपर्यंतच्या आधुनिक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणे आवश्यक आहे. डॉ. दुधभाते नेत्रालयात अशा स्वरूपाच्या सर्वसमावेशक सेवा उपलब्ध आहेत .असे डॉ. रवींद्र कोल्हे यांनी सांगितले
डॉ. स्मिता कोल्हे यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत रुग्णकेंद्रित दृष्टिकोन” *महत्त्वाचा असल्याचे नमूद केले डॉ. अनिल दुधभाते यांच्या वैद्यकीय व सामाजिक कार्याबरोबरच नेत्रालयाच्या व्यवस्थापनाचेही त्यांनी कौतुक केले.
आरोग्यसेवा आणि सामाजिक कार्याला आयुष्य समर्पित केलेल्या कोल्हे दाम्पत्याची भेट आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या शब्दांमुळे ग्रामीण व गरजू घटकांपर्यंत नेत्रसेवा अधिक व्यापकपणे पोहोचविण्याची प्रेरणा मिळाली,” असे डॉ. अनिल दुधभाते यांनी सांगितले यावेळी साहित्यिक श्री. गिरीश वसेकर, श्री. नितीन पाटील, श्री. राजेंद्र शेळके, शीतल हिराळकर आणि अंकुर दुबे उपस्थित होते.





