Gopichand Padalkar : पडळकरांचे विधान पुन्हा चर्चेत! “जयंत पाटलांनी केतकी चितळेचा आदर्श घ्यावा”; जाहीर भाषणातून सल्ला

सांगली: गेल्या काही दिवसांपासून विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांची विधाने माध्यमांत येत नव्हती. आता पडळकर पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. सांगलीतील एका कार्यक्रमात पडळकारांचे विधान चर्चेचा विषय बनला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या सर्वपक्षीय खासदार आमदारांचा सांगलीमध्ये सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाच्या भाषणात पडळकांरीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सल्ला दिला आहे.
या कार्यक्रमात विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे एकाच व्यासपीठावर आले होते. हा कार्यक्रमाचे आयोजन सांगली जिल्हा ब्राम्हण समाजाच्या वतीने करण्यात आले होते. याच कार्यक्रमाच्या भाषणामध्ये पडळकरांनी जयंत पाटलांनी केतकी चितळेचा आदर्श घेऊन चितळेप्रमाणे भूमिकेवर ठाम राहावे, असा सल्ला दिला आहे. त्यांनी हे विधान पाटील या कार्यक्रमातून गेल्यानंतर केले आहे.
जयंत पाटलांनी केतकी चितळेचा आदर्श घेऊन केतकी चितळेप्रमाणे भूमिकेवर ठाम राहावे. नाहीतर सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री आणि आता दारात, अशी भूमिका घेऊन राजकारणात चालत नाही, अशा शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांवर टीका केली. तसेच केतकी चितळेचा आदर्श घेत जयंत पाटलांनी भूमिका मांडावी असेही पडळकर म्हणाले. ज्यांना राजकारण करायचे आहे, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा आदर्श घ्यावा आणि ज्यांना भूमिका मांडायची आहे त्यांनी केतकी चितळेचा आदर्श घेतला पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले आहे.
कार्यक्रमात पाटील काय म्हणाले?
अलीकडे वेगवेगळ्या समाजाचा द्वेष करण्याची फॅशन सुरू झाली आहे. आपल्या समाजातील आपलं नेतृत्व वाढायचं असेल तर दुसऱ्यांना शिव्या देणं ही पद्धत सुरू झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. अशा व्यक्तीला समाज डोक्यावर घेतो आणि तो व्यक्ती समाजाचा नेता होतो. हे दुर्दैवाने या देशात पाहायला मिळत आहे, अशी खंत देखील आमदार जयंत पाटलांनी व्यक्त केली आहे.





