नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना बुधवारी रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानातून नाट्यमयरीत्या अटक करण्यात आली. आयएनएक्स मीडिया प्रकरणासोबतच आणखी चार प्रकरणांत ईडीने त्यांची चौकशी सुरू केल्याने त्यांच्या अडचणींत वाढच होत आहे. सीबीआयने रात्रभर चिदम्बरम यांची चौकशी केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आज दुपारी दोन वाजता चिदंबरम यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यावेळी सीबीआय 14 दिवसांची कोठडी मागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कॉंग्रेस पक्ष आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहे.
कॉंग्रेस मुख्यालयात बुधवारी चिदंबरम यांनी पत्रकारांसमोर आपली बाजू मांडली. यावेळी ते म्हणाले की, मी फरारी आहे, न्यायप्रक्रिया टाळत आहे, असा अपप्रचार पद्धतशीरपणे केला गेला. पण मी उलट न्यायासाठीच गेले तास माझ्या वकिलांशी चर्चा करीत होतो. मी कायद्याचे पालन करणारा आहे आणि तपास यंत्रणांनीही कायद्याचे पालन करावे. माझ्याविरोधात एकही आरोपपत्र दाखल नाही, उलट एका प्रकरणात मला आधीच तपास यंत्रणेकडून निर्दोष जाहीर करण्यात आले आहे. मी, माझा मुलगा किंवा माझ्या कुटुंबातील कोणीही भ्रष्टाचार केलेला नाही. शुक्रवारी मी सर्वोच्च न्यायालयात हजर राहणार आहे. दरम्यान, आज कॉंग्रेस पक्षाकडून या प्रकरणावर दुपारी पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.