ओझर: अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहराची द्वार यात्रा मंगलमय वातावरणात सुरू आहे. आज मंगळवारी, दि. २६ ऑगस्ट रोजी तिसरा पश्चिमद्वार शिरोली खुर्द येथे रति-कंदर्प पूजा करून उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सकाळी १० वाजता श्रींच्या पालखीचे प्रस्थान शिरोली खुर्दच्या दिशेने झाले. या पालखी सोहळ्यात हजारो ग्रामस्थ भक्तिभावाने सहभागी झाले. भजन, ढोल, आणि लेझीम पथकांनी उत्साहपूर्ण सादरीकरण केले. मार्गावरील महिलांनी आपल्या घरासमोर सडा-रांगोळी काढून पालखीचे स्वागत केले. शिरोली खुर्द येथील ग्रामस्थांनी द्वार यात्रेसाठी सुंदर नियोजन केले होते. भाविकांनी आकर्षक पोशाख परिधान करून पालखीचे स्वागत केले. मार्गावर पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. पालखी सोबत असणाऱ्या भाविकांना मंडळे आणि व्यक्तिगतरीत्या खिचडी, केळी, वेफर्स आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले. अनवाणी चालत श्रींच्या पालखी सोबत जाणे, हे या द्वार यात्रेचे वैशिष्ट्य आहे. शिरोली खुर्द येथे तिसऱ्या पश्चिमद्वारमध्ये रति-कंदर्प पूजा पार पडली, जिथे गणराय आपल्या बहिणीला निमंत्रित करण्यासाठी गेले. या द्वार यात्रेत ओझर आणि पंचक्रोशीतील पाच हजारांहून अधिक भाविक सहभागी झाले. शिरोली ग्रामस्थांच्या वतीने देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे आणि उपस्थित विश्वस्त मंडळाचा सत्कार करण्यात आला. अशा प्रकारे तिसरी द्वार यात्रा यशस्वीपणे संपन्न झाली.