ओझर- भाद्रपद चतुर्थीनिमित्त अष्टविनायकातील प्रमुख तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र ओझर येथे पालखी सोहळ्याला उत्साहात सुरुवात झाली आहे. येथील परंपरागत द्वारयात्रेचा दुसरा द्वार सोमवारी (दि. २५) धनेगाव (धनगरवाडी) येथे उमा-महेश पूजेने मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या पालखी सोहळ्यात श्रीराम प्रसादिक भजनी मंडळ आणि श्री विठ्ठल प्रसादिक भजन मंडळ, ओझर यांनी सहभाग घेतला. गणेश जयंती उत्सवानिमित्त गणपती भगवान आपल्या बहिणींना निमंत्रित करण्यासाठी उंब्रज, धनेगाव, शिरोली खुर्द आणि ओझर येथील आंबेराई मंदिरात पालखीत जातात. शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही द्वारयात्रा आज सकाळी धनेगाव येथे मार्गस्थ झाली. पालखी मार्गावर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. अनेक ठिकाणी मंडळे आणि व्यक्तिगत पातळीवर भाविकांना खिचडी, केळी, वेफर्स आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले. अनेक गणेशभक्त पालखी सोबत अनवाणी चालताना दिसले. दुसऱ्या दक्षिणद्वाराचे उमा-महेश पूजन धनेगाव येथे संपन्न झाले. येथे जाऊन गणराय आपल्या बहिणीला निमंत्रित करून आले. यावेळी श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे आणि विश्वस्त मंडळाचा धनेगाव ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. या द्वारयात्रेत ओझर आणि पंचक्रोशीतील सुमारे पाच हजारांहून अधिक भाविक सहभागी झाले होते. सायंकाळी ४ वाजता पालखी श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट येथे पोहोचली. ओतूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी उत्तम बंदोबस्त ठेवल्याने ही यात्रा निर्विघ्नपणे पार पडली.