Ozar News : व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलमध्ये कारगिल विजय दिवस आणि इन्व्हेस्टिचर सेरेमनी उत्साहात संपन्न

ओझर : विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, वडगाव कांदळी येथे कारगिल विजय दिवस आणि इन्व्हेस्टिचर सेरेमनी या दोन्ही कार्यक्रमांचा भव्य संयुक्त सोहळा शालेय प्रांगणात अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, नेतृत्वगुण व जबाबदारीची जाणीव या मूल्यांची पेरणी करणारा हा सोहळा विविध उपक्रमांनी परिपूर्ण ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात,मान्यवरांचे स्वागत,दीपप्रज्वलन व कारगिल युद्धातील शहीद वीरांना आदरांजली अर्पण करून करण्यात आली. यावेळी देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांच्या स्मृती जागवताना उपस्थितांचे डोळे पाणावले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक व वनरक्षक सामाजिक वनीकरण परिक्षेत्र जुन्नर रमेश खरमाळे, स्मिता कवडे,वनपाल मनीषा काळे,वनपाल संतोष आगरकर, वनरक्षक शौकत अली,अक्षय कदम,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष किशोर काकडे तसेच सदस्यवर्षा बढे,सुजाता भोर,स्वाती काकडे,योजना भोर ,शुभांगी गुंजाळ,राहुल घाडगे, सत्यवान काळे,सचिन बढे तसेच काही महिला पालकांचीही उपस्थिती लाभली.
विशाल जुन्नर सेवा मंडळाचे विश्वस्त विक्रांत काळे आणि सी.ई.ओ.गायकवाड सर कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. यानंतर पार पडलेल्या इन्व्हेस्टिचर सेरेमनीत नव्याने निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते जबाबदाऱ्यांचे बॅजेस प्रदान करण्यात आले. हेड बॉय, हेड गर्ल, हाउस कॅप्टन, व्हाईस कॅप्टन, यांसारख्या पदाधिकार्यांनी उत्साहात शपथ घेत शाळेचा सन्मान, शिस्त आणि सेवा यांचा वारसा पुढे नेण्याची ग्वाही दिली.
रायफल शूटिंगच्या प्रात्यक्षिकाने विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता,नियंत्रण व समतोल यांचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या नेतृत्व, शिस्तआणि विविध कला कौशल्य या गुणांचे कौतुक करून त्यांना उत्तम मार्गदर्शन केले सामाजिक वनीकरण विभागाकडून “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” हा संदेश या माध्यमातून देण्यात आला. उपस्थित मान्यवरांपैकी वनपाल मनीषा काळे यांनी वृक्षांचे महत्त्व सांगणारे तसेच देशाभिमान जागृत करणारे एक सुंदर गीत सादर केले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली.
शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले. समन्वयिका जयश्री कुंजीर व श्वेता कोकणे यांचेही सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी शाळेच्या शिक्षिका पुनम राऊत व किरण मुळे यांनी सूत्रसंचालन केले; तर शिक्षिका नीलम शेळके यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व संचालन सर्व क्रीडा शिक्षक, कलाशिक्षक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे केले.





