Oyun-Erdene Luvsannamsrai : मंगोलियाचे पंतप्रधान ओयुन-एर्डेन लुवसानमस्राय यांनी दिला राजीनामा

तैपेई, (तैवान) : मंगोलियाचे पंतप्रधान ओयुन-एर्डेन लुवसानमस्राय यांनी आज अचानक राजीनामा दिला असून त्यामुळे देशात राजकीय अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून लुवसानमस्राय यांच्याविरोधात आंदोलन सुरू झाले होते. पंतप्रधानांच्याविरोधात संसदेमध्ये मांडला गेलेला अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. मात्र आपल्याला पदावरून हटवले गेल्यास मंगोलियाच्या लोकशाहीचे अवमूल्यन होईल, असा इशारा लुवसानमस्राय यांनी दिला होता.
पंतप्रधानांच्या मुलाने आलिशान जीवनमानासाठी भरमसाठ खर्च केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनाला सुरुवात झाली होती. पंतप्रधानांच्या मुलाने आपल्या मैत्रिणीसाठी महागडे दागिन्यांची खरेदी आणि हेलिकॉप्टरची सफर केली होती. या पैशाच्या उधळपट्टीमुळे मंगोलियातील श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी अधोरेखित झाली होती. संसदेतील अविश्वास ठरावाच्यावेळी १२६ मतांपैकी पंतप्रधानांच्या बाजूने अवघी ४४ मते पडली. निवडणूकीद्वारे नवीन पंतप्रधान निवडला जाईपर्यंत ते काळजीवाहू पंतप्रधान राहणार आहेत.
चीन आणि रशियाचा प्रभाव…
चीन आणि रशियाच्या सीमांमध्ये असलेल्या मंगोलियाची लोकसंख्या अवघी ३५ लाख इतकी आहे. देशातील खाणींमधून मिळणारी खनिज संपत्तीची निर्यात हा मंगोलियाचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत आहे. मात्र मंगोलियाने विदेशी खाण उद्योगांशी टेबलाखालून तडजोड केल्याची अफवा अलिकडच्या काळात पसरल्याने सरकारविरोधात असंतोष निर्माण झाला होता. शीत युद्ध समाप्त झाल्यावर मंगोलियाने साम्यवाद सोडून दिला. तेंव्हापासून देशात लोकशाही रुजू लागली आहे. देशातील खनिजांची ९२ टक्के निर्यात चीनला केली जाते.





