स्वतःच्या अंधत्वावर मात करत ते असंख्य अंध-अपंगांचे आधार बनले

शेवगाव – स्वतःच्या अंधत्वावर मात करत ते असंख्य अंध अपंगाचे आधार बनले. सुदृढ व गर्भश्रीमंतांनाही लाजविल असे दातृव जोपासले आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून गौरविल्या जाणाऱ्या कार्यकर्त्यापेक्षा कांकणभर अधिक समाजिक कार्याचं कर्तृत्व ज्यांच्या पदरी आहे.
असे सध्या पुणे येथे सामाजिक कार्यात व्यग्र असलेले श्री क्षेत्र अमरापूरचे अंध भूमिपुत्र, सुनील मदनलाल चोरडिया नुकतेच दिवाळी निमित्त गावी आले आणि येथेही काही देऊनच गेले. देश पातळीवरील 53 पुरस्कारांनी सन्मानित चोरडिया त्यांच्या सामाजिक कर्तृत्व आणि दातृत्वापुढे नतमस्तक व्हावे असे हे महान कार्य आहे.
चोरडिया करत असलेल्या विविध सामाजिक कामांसाठी त्यांनी आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे शासकीय अनुदान घेतलेले नाही. तथापि त्यांच्या संग्रही मोठा मित्र परिवार व समाजातील दानशूर हितचिंतक वर्ग आहे. त्यांच्या सहकार्यानेच त्यांनी या सामाजिक कार्याचा गोवर्धन उचलला आहे. यानिमित्ताने त्यांच्या जीवनपटाची अन् कार्याची ओळख व्हायला हवी.
अपंगांसाठी पूर्णवेळ काम करणारे येथील सुनिल चोरडिया स्वतः अंध असून पुणे येथे आपल्या संस्थेच्या माध्यमातून 1991 पासुन हजारो अंध आणि अपंगांना स्वावलंबी बनविण्याचे कार्य करत आहेत. समाजाने दुर्लक्षित केलेल्या अंध आणि अपंग मुलांसाठी चोरडिया मोठा आधार ठरले आहेत. त्यांचे डोळस सुपुत्र अक्षय हे देखील सध्या वडिलाच्या कार्यात रमले आहेत.
पुणे येथे चिंचवडच्या मोहन नगर मध्ये “हॅण्डी कॅप सेंटर” ( अपंग रोजगार उद्योग व तांत्रिक प्रशिक्षण केंद्र ) ही त्यांची संस्था असून तीच्या दोन अंध शाळा ,एक अनाथालय आणि दोन ट्रेनिंग सेंटर आहेत. करोनाकाळामध्ये त्यांच्या संस्थेने सलग तीन महिने सकाळी तब्बल 1800 तर संध्याकाळी 1500जेवणाचे डबे गरजूंना पोहच केले आहेत. याच काळात 8560 किराणा किटचे वाटप केले.
आत्तापर्यंत 16 निराधार अंध अपंग मुलींचे लग्न लावून त्यांचे संसार उभे केले. त्यांनी 48 रक्तदान शिबीरांचे तर 42 नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन केले असून 486 अपंग व्यक्तींना रोजगार मिळवून दिला आहे. तसेच 25 अंध आणि अपंगांना स्वतःचे व्यवसाय सुरू करून दिले. 122 अपंगांना सायकल, 4 अपंगांना व्हीलचेअर दिल्या आहेत. आजही दर महिन्याला 132 गरीब कुटुंबाना रेशन पुरवित असून 19 व्याधिग्रस्तांना दर महिन्याला औषधे देत आहेत.
यावेळीही चोरडिया अमरापूरला आले असता तिसगावच्या अपंग मुलाला व्हीलचेअर तर अमरापूर व तिसगाव येथील काही कुटुंबांना किराणा साहित्याचे कीट देऊन गेले. या निमित्ताने शेवगाव रोटरी क्लबच्यावतीने त्यांचा अमरापूर गावात यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी शेवगाव रोटरीचे अध्यक्ष बाळासाहेब चौधरी, माजी सहप्रांतपाल संजय लड्डा, इनरव्हीलच्या अध्यक्षा मनीषा लड्डा, रो. प्रदीप बोरुडे, रो. डॉ. अरविंद पोटफोडे, मदनलाल चोरडिया, कुसुमताई चोरडिया, प्रकाश गरड, संतोष चोरडिया, दिलीप म्हस्के आणि ग्रामस्थ उपस्थित होते. महेश लाडणे यांनी आभार मानले.





