Shirur News: शिरूरमध्ये वीजप्रश्नावरून संताप; रामलिंग रोडसह पेठ भागातील नागरिक अंधारात, रोहित्र बदलण्याची मागणी
Shirur News:

Shirur News: शिरूर शहरातील मारुती आळी, सरदार पेठ आणि रामलिंग रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वीज खंडित होण्याचे सत्र सुरू असल्याने नागरिक आणि व्यापारी वर्ग पुरता हैराण झाला आहे. उन्हाळ्याच्या कडाक्यात वीज गायब होत असल्याने महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात असून, तातडीने रोहित्रांची (ट्रान्सफॉर्मर) क्षमता वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.
वाढत्या उष्म्यासोबत समस्यांत वाढ –
सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने एसी, कुलर आणि पंख्यांचा वापर वाढला आहे. परिणामी, उपलब्ध विद्युत रोहित्रांवर अतिरिक्त ताण येत आहे. यामुळे वारंवार ‘फेज’ जाणे, लो-व्होल्टेज मिळणे किंवा वीज पुरवठा पूर्णपणे खंडित होणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. रात्रीच्या वेळी वीज गेल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांचे हाल होत असून नागरिकांना रात्र जागून काढावी लागत आहे.
व्यापारी आणि आरोग्यावर परिणाम –
विजेच्या लपंडावाचा मोठा फटका बाजारपेठेला बसत आहे. दुकानांमधील फ्रीज आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे निकामी होण्याची भीती निर्माण झाली आहे. परिसरातील दवाखान्यांमध्ये वीज नसल्याने रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. बहुमजली इमारतींमधील लिफ्ट आणि पाण्याच्या मोटारी बंद पडत असल्याने रहिवाशांची गैरसोय होत आहे.
संबंधित भागातील रोहित्रांची क्षमता आताच्या गरजेनुसार अपुरी आहे. महावितरणने तातडीने अतिरिक्त रोहित्र बसवून लो-व्होल्टेजचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी मागणी केली जात आहे.
आंदोलनाचा इशारा –
या संदर्भात परिसरातील वीज ग्राहकांनी महावितरण कार्यालयाला लेखी निवेदन दिले आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विनित बोरा, सागर चव्हाण, राजेंद्र लोळगे व इतर स्थानिकांनी दिला आहे. महावितरण आता यावर काय पावले उचलणार, याकडे शिरूरकरांचे लक्ष लागले आहे.





